राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचला आहे. अशातच राजकीय वर्तुळातील नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून सोबत प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये शरद पवार थांबले त्याच हॉटेलमध्ये दानवे सुद्धा दाखल झाले होते आणि त्यानंतर दोघांनी सोबत एकाच गाडीतून प्रवास करत ते गेवराईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – ढाल- तलवार ते धनुष्यबाण असा आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास)
दरम्यान निवडणूक आयोगाने शनिवारी धनुष्यबाण हे चिन्ह गोठावले असून याचा सर्वाधिक फटका हा उद्धव ठाकरेंच्या गटाला बसणार आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे एकाच वाहनातून प्रवास करताना दिसून आल्याने राजकारणात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
गेवराईत आज रविवारी माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे हे दोघेही औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत. असे सांगितले जात आहे की, शिवाजीराव पंडित हे शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज गेवराईत होणार आहेत. या सोहळ्याला शरद पवार आणि रावसाहेब दानवेंसह सर्वच पक्षातील दिग्गज नेतेही उपस्थिती लावणार आहे.
Join Our WhatsApp Community