पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांचे नाव पत्राचाळ प्रकरणात घेतले होते. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मौन सोडलं असून पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा, जितक्या लवकर करायची तेवढी करा, चौकशीला आम्ही नाही म्हणत नाही. पण पराचा कावळा करू नका, असे आवाहनही पवारांनी केले आहे. यासह हे आरोप खोटे ठरल्यास काय कराल, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – Patra Chawl Case: राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला PMLA कोर्टात सुनावणी )
दरम्यान, पवारांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांनी १४ जानेवारी २००६ रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय, असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवारांनी घेतल्या होत्या. चर्चा करून संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवारांनी व्यक्त केले होते.
काय केली भाजपने मागणी
ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. ही मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. पत्राचाळ भ्रष्टाचाराचा आवाका पाहता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे, असे सुरूवातीपासूनच वाटत नव्हते. याबाबत पत्र लिहून पत्राचाळ घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकरांनी केली होती.
Join Our WhatsApp Community