राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आता पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्येही तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
या दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र नवीन सहकार खाते, महाराष्ट्र आणि देशातील सहकाराचे प्रश्न यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
Rajya Sabha MP Shri Sharad Pawar met PM @narendramodi. @PawarSpeaks pic.twitter.com/INj26CLl0k
— PMO India (@PMOIndia) July 17, 2021
(हेही वाचाः तुमचं ठरलं असेल तर आम्हालाही सांगा, आम्हीही तयारीला लागतो! पवारांनी व्यक्त केली नानांवरची नाराजी)
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक
सोमवार 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि संरक्षणविषयक बाबींवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजत आहे. शरद पवार यांनी केंद्रीय पातळीवर कृषी आणि संरक्षण खाच्यांची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. त्यामुळे या क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांवर मोदी आणि पवार यांच्याच चर्चा झाली आहे.
सहकार मंत्रालयाबाबत काय म्हणाले होते पवार?
मोदी सरकारने नव्या सहकार मंत्रालयाची सुरुवात करुन त्याचा अतिरिक्त भार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे या नव्या खात्याच्या माध्यमातून राज्यांतील सहकार चळवळीला आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा शरद पवार यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. राज्यघटनेनुसार सहकार हा राज्यसूचीतील विषय आहे. त्यामुळे या विषयात हस्तक्षेप करण्याचा केंद्र सरकारला काहीही अधिकार नाही. त्यामुळे नव्या सहकार मंत्रालयाने महाराष्ट्रावर कोणतही गंडांतर येणार नाही, असे म्हणत याबाबतीत होत असलेल्या उलटसुलट चर्चांना काहीही अर्थ नाही, असे पवार म्हणाले होते.
(हेही वाचाः महाविकास आघाडीतील मतभेद पोहचले पवारांच्या दारी!)
पवारांच्या भेटींचे सत्र
आधी प्रशांत किशोर, मग राज्यातील नेते, विरोधक, काँग्रेस नेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा भेटींचे सत्र पवारांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. शुक्रवारी त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यामुळे शनिवारी मोदी आणि त्यांच्यात झालेली भेट ही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर असली, तरी त्यात काही सुप्त राजकारण शिजत असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community