शरद पवार म्हणतात, ‘मोदी मेहनती, ठरवतात ते करून दाखवतात!’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलतात तेव्हा ते कोणताही आड पडदा न ठेवता बोलतात. अशाच प्रकारे एक मुलाखतीत बोलताना पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे. मोदी एखादे काम हाती घेतले की, ते पूर्णच करतात, असे पवार म्हणाले.

मोदींची प्रशासनावर पकड 

मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही देतात. एकदा का कोणतेही काम हाती घेतले की ते (काम) पूर्ण होईपर्यंत ते थांबणार नाही, याची काळजी घेतात, असा मोदींचा स्वभाव आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे सहकारी कसे एकत्र येऊ शकतात, यावर भर देतात. मित्रपक्षांना सोबत घेण्याची मोदींची पद्धत वेगळी आहे आणि ती शैली मनमोहन सिंग किंवा त्यापूर्वीच्या पंतप्रधानांमध्ये नसल्याचेही ते म्हणाले. गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणतेही सूडाचे राजकारण केले जाऊ नये, असे माझे आणि तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मत होते.

(हेही वाचा राज्यात सरकार स्थापनेसाठी मोदींनीही दिलेली ऑफर! शरद पवारांचा गौप्यस्फोट)

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी आक्रमक 

मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मी केंद्रात होतो. जेव्हा पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावत असत तेव्हा मोदी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या गटाचे नेतृत्व करायचे आणि केंद्रावर हल्लाबोलही करत. अशा परिस्थितीत मोदींना कसे उत्तर द्यायचे याची रणनिती तयार केली जायची. युपीएमध्ये माझ्याशिवाय अन्य कोणताही मंत्री नव्हता जो मोदींशी चर्चा करू शकायचा. ते मनमोहन सिंग सरकारवर सातत्याने हल्लाबोल करायचे, असे म्हणत पवार यांनी एक किस्सा सांगितला. भलेही मोदी आणि भाजप यांच्यासोबत मतभेद असतील, तरी ते मुख्यमंत्री आहेत हे विसरता कामा नये, असे आपण युपीएच्या अंतरिम बैठकीत सर्वांना सांगायचो. त्यांच्या पाठी जनादेश आहे हेदेखील विसरता कामा नये. जर ते याठिकाणी काही मुद्दे मांडत असतील तर, मतभेद दूर करत त्यांचे निराकरण व्हावे आणि त्यांच्या राज्यातील लोकांचं हित जपले जावे हे आपले कर्तव्य आहे. मनमोहन सिंग यांनीदेखील या मताच स्वागत केले होते, असेही पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here