तुमचं ठरलं असेल तर आम्हालाही सांगा, आम्हीही तयारीला लागतो! पवारांनी व्यक्त केली नानांवरची नाराजी

पक्ष वाढवण्याबाबत कोणाचही दुमत नाही, पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या मित्र पक्षांवर सतत टीका करत स्वबळाचा नारा देणा-या नानांवर महाविकास आघाडी सरकारमधील नेतेच नाही, तर खुद्द काँग्रेसचे काही नेते सुद्धा नाराज आहेत. पण नानांच्या याच बेधडक वक्तव्यांवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी त्यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पवारांनी नानांवरची खुली नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

तुम्ही जर वेगळं लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तसं आम्हालाही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्हालाही तयारीला लागता येईल, असे शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना खडसावले आहे. जर दिल्लीवरुन तसं काही ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही आणि जर नाना पटोलेंना अधिकार दिले असतील, तर त्याचीही कल्पना आम्हाला द्या. पक्ष वाढवण्याबाबत कोणाचही दुमत नाही, पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही, अशा शब्दांत पवारांनी नानांना कानपिचक्या दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचाः भाजप बहुजनविरोधी पक्ष! नाना पटोलेंची टीका)

काय म्हणाले होते नाना?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना स्वबळाचा नारा देऊन, त्यांना कामाला लागायला सांगितले. पण हाच स्वबळाचा नारा मी दिला तर यांना त्रास होतो, अशा शब्दांत नानांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहेत, ते कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कामाला येत नाहीत. कमिटीवर राहायचं असेल तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास पालकमंत्री देतात त्या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा आणि काँग्रेसचा पालकमंत्री आणून दाखवा, असा अजब सल्ला नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर आपण नाराज असल्याचा संदेश त्यांनी यातून दिला होता.

मला बारामतीत प्लॅनिंग करावं लागेल

कॉंग्रेसला मानणारा बराच वर्ग बारामतीमध्ये आहे. तिथे मला प्लॅनिंग करावं लागेल. तिथे होणाऱ्या अत्याचार व्यवस्थेच्या विरोधात जो उद्रेक आहे, तो मला माहिती आहे. मात्र आपल्याला पुढे जायचे असेल तर दुष्मनाच्या घरातच जाऊन मारले पाहिजे, असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीच्या पवार पॅटर्नला लगावला होता.

(हेही वाचाः मुंबईत काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस घेतेय प्रेरणा!)

ती लहान माणसं- पवार

नानांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याआधीही नानांना चांगलेच फटकारले होते. नानांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, या गोष्टीत मी काही पडत नाही. ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू. एकवेळ सोनिया गांधी काही म्हणाल्या असत्या तर मी बोललो असतो, अशा शब्दांत त्यांनी नानांचा अनुल्लेख करत त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here