सध्या महाविकास आघाडी सरकारमधील आघाडीचे मंत्री हे भ्रष्टाचाराच्या आरोपासमोर गलितगात्र बनले आहेत. त्यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मंत्र्यांच्या विरोधात अक्षरशः बाह्या सरसावल्या आहेत. सध्या सोमय्या यांनी सरकारमधील १२ मंत्र्यांची यादी बनवली आहे. असेच सुरु राहिले तर सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे.
नवीन व्यूहरचना ठरणार?
शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवास्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने ईडीच्या कारवायांचा सुरु असलेला सपाटा हा विषय प्रमुख असण्याची शक्यता आहे. त्यावर काय व्यूहरचना आखायची, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर राज्यातील विविध घडामोडी, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्न यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यावेळी खडाजंगी झाली होती, मंत्री सुभाष देसाई यांनी विरोध केला होता. या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा : करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची ४ तास झडती! भाजपा उतरली मैदानात)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही चर्चा!
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. म्हणून कोविड – 19 संसर्गाची तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका, महामंडळांच्या नेमणुका, तसेच महाविकास आघाडीतील काही राजकीय प्रश्नांवरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community