गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. इस्लामपूर येथील सभेत त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन नवा वाद उपस्थित होत आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विरोधकांनी यावरुन मिटकरी यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मिटकरी यांच्या भाषणात त्यांनी केलेल्या विधानाचा मला खेद असून, असं वक्तव्य योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्या विधानाचा मला खेद
अमोल मिटकरी यांचं भाषण विनोदी असल्यामुळे सगळेजण त्यावर पोट धरुन हसत होते. पण त्यामध्ये त्यांनी लग्न समारंभाच्या वेळी केल्या जाणा-या मंत्रांचा उल्लेख करुन जे वक्तव्य केलं, त्यानंतर मी त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. त्यांचं विधान वैयक्तिक असून ती त्यांची मतं आहेत. आम्हाला ब्राह्मण समाजाने कायमंच सहकार्य केलं आहे. त्यामुळे त्यांना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. पण मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे जर ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याचा आम्हाला खेद असून, त्यांचं ते वक्तव्य योग्य नसल्याचं म्हणत पाटील यांनी ब्राह्मण समाजाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे.
(हेही वाचाः रवी राणांची मातोश्रीवर जाण्याची तारीख ठरली, शिवसेनाही आक्रमक)
काय होतं मिटकरींचं वक्तव्य?
इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलताना मिटकरी यांनी लग्न समारंभाच्या वेळी केल्या जाणा-या मंत्रोच्चारांची खिल्ली उडवली होती. एका लग्नाला गेलो असताना तिथं कन्यादानाचा विधी पार पडत होता. आता कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? लग्न लावणारे महाराज तुमचा हात, तुमच्या पत्नीच्या हातात द्या, असं म्हणत होते. त्यानंतर मम भार्या समर्पयामि असा मंत्र त्यांनी उच्चारला. या मंत्रोच्चारावरुन मिटकरी यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण महासंघातर्फे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.
(हेही वाचाः दडवलेला इतिहास लोकांसमोर आला हे महत्वाचं, ‘द काश्मीर फाईल्स’च्या बिट्टा कराटेचं मत)
Join Our WhatsApp Community