पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावंडांमधील राजकीय वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण बुधवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
प्रभादेवी येथे एका नेत्रालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, पंकजा ताईंनी महाविकास आघाडीची लेन्स लावली तर बरं होईल, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. त्यानंतर हे आदित्य ठाकरेंनी मला सांगितल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आडून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्रातही ओबीसींना आरक्षण मिळणार, छगन भुजबळ ठाम)
काय म्हणाले धनंजय मुंडे
तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यावेळी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी लेन्स या शब्दावरुन धनंजय मुंडे यांना टोला लगावला. मुंडे-महाजनांच्या लेन्समधून स्वतःला मोठे करत पवार साहेबांच्या लेन्समधून बघणारे धनंजय मुंडे, असा उल्लेख पंकजा मुंडे यांनी केला. त्यानंतर आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना शालजोडीतले लगावले. कधीतरी अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं. कदाचित ताईंनी लेन्स बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं होईल, असं आदित्य ठाकरे आपल्याला मला म्हणत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
(हेही वाचाः हार्दिक पटेलचा काँग्रेसला ‘टाटा-बाय बाय’)
आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. इथल्या ब्रेकिंग न्यूज ऐकून जे इथे नाही आहेत त्यांच्यासाठी ही हार्ट ब्रेकिंग न्यूज असू शकते. पण कुठलीही चुकीची ब्रेकिंग न्यूज जाऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो. पंकजाताई तुम्हाला अजून चष्मा लागलेला नाही. पण लागलाच तर तो कोणता लावावा, इतकंच मी धनंजय मुंडे यांना सांगितलं बाकी पुढचं काही बोललो नाही, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं.
Join Our WhatsApp Community