आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार, ‘त्या’ तीन महिला कोण?

153

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे त्यांच्यातील आक्रमक शैलीतून बोलण्याच्या स्वभावाने कमी कालावधीत प्रसिद्ध झाले, माध्यमांच्या जवळचे झाले. त्यामुळे लगेचच त्यांना राष्ट्रवादीने आमदार बनवले. संभाजी ब्रिगेडमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे अमोल मिटकरी हे मात्र अडचणीत सापडणार आहे, कारण पक्षांतर्गत त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे नाव जवळपास सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांच्या भाषणाने राष्ट्रवादी चांगलीच चर्चेत आली. मिटकरींच्या भाषणाने राष्ट्रवादीचे व्यासपीठ गाजून निघाले. अमोल मिटकरी हे विरोधकांवर अत्यंत कडाडून आणि आक्रमक शैलीत टीका करत असल्याने त्यांचा राष्ट्रवादीला फायदा झाला. मात्र याच अमोल मिटकरींवर आता गंभीर आरोप झाले आहेत. हे आरोप एखाद्या विरोधकांकडून नव्हे तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून हा आरोप झाल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी मिटकरींवर हे आरोप केले आहेत. मोहोड म्हणाले की, मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मला पक्षशिस्त माहित आहे. त्यामुळे मी कुठल्याही वृत्तपत्रात अथवा जाहीरपणे आरोप केले नाही. मी प्रदेशाध्यक्षांकडे सगळे आरोप केले. ही व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमात व्हायरल झाली. या व्हिडिओ क्लिपनंतर पत्रकारांनी मला प्रश्न विचारले. तरीही मी शांत होतो. मात्र आमदारांनी माझ्या चारित्र्यावर आरोप लावला. आमदारांना मी काय दिले आणि काय नाही याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी किती पैसे दिले वैगेरे हा विषय जाऊद्या असे मोहोड यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात किती जणांना मिळणार संधी? मुनगंटीवारांनी सांगितला आकडा)

मिटकरींच्या विरोधात पुरावे देणार 

माझ्या चारित्र्यावर जे प्रश्न निर्माण केले ते सगळ्यात आधी आमदारांनी स्वत:चे चारित्र्य पाहावे, यांचे पात्रुडचे महिला प्रकरण आजही गाजत आहे. मुख्य नेत्यांना महिला जाऊन भेटत आहे. या प्रकारावर पडदा पडला नाही, तोवर दुसरी एक महिला काँग्रेस पदाधिकारी जिला १० लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्यात आले ते काय प्रकरण होते, ते अमोल मिटकरींना विचारा. तिसरे प्रकरण, आचारसंहिता सुरू असताना पुण्यातील एक महिला पदाधिकारी अकोल्याच्या रेस्ट हाऊसवर ३ दिवस मुक्कामी कशी? ते प्रकरण काय आहे विचारा. आमदार स्वत:ला गरीब म्हणतात आणि ८० लाखांचा प्लॉट घेतात तेही अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीत. आमदार मिटकरींनी माझ्यावर जे आरोप लावले त्यातील एक पुरावा देऊन दाखवावा मी भरचौकात फाशी घेईन. पुरावे दिले नाही तर येणाऱ्या १० दिवसांत मी मिटकरींच्या घराबाहेर बसून पत्रकार परिषद घेईन, त्यात आमदारांनी काय काय केले त्याचे पुरावे सादर करेन, असा इशारा शिवा मोहोड यांनी दिला.

तर अमोल मिटकरींचा ५० वेळा चौरंगा केला असता

अकोला जिल्ह्यातील पात्रुडचे तालुक्यातील महिला प्रकरण खूप गाजले. त्यातील आमदाराने पाया पडतानाचे फुटेज आहे. ते मी बाहेर काढेन. अमोल मिटकरींची अनेक प्रकरणे आहेत. १० दिवसांनी मी सर्वांसमोर मांडेन. एका महिलेला १० लाख रुपये देऊन प्रकरण मिटवतो, मग याच्याकडे पैसा किती आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी केली आहे. लोकांना नाव ठेवतो परंतु स्वत: आरशात पाहायला हवे, छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर अमोल मिटकरींचा ५० वेळा चौरंगा केला असता. इतकी महिला प्रकरणे अमोल मिटकरींची आहेत. १० दिवस माझ्यावरील आरोपांबाबत मिटकरी काय पुरावे देतात, हे पाहणार. त्यानंतर ११व्या दिवशी मी मिटकरींच्या घरासमोर सगळ्यांच्या समक्ष पुरावे सादर करेन, असा इशारा शिवा मोहोड यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.