ठाकरे सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरील आरोपांवरुन विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी राजीनाम्याची ही मागणी लावून धरत मलिकांविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेत भाजप आमदारांनी सह्या केल्याच, पण धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीचेच आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी देखील मलिकांविरोधात स्वाक्षरी केली. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सत्ताधा-यांच्या भुवया उंचावल्या, तर विरोधकांनी झिरवाळांना ‘सही रे सही’ म्हणत त्यांचं कौतुक केलं.
इतकंच नाही तर मंत्री आदित्य ठाकरेंनी सहीसाठी पेन हातात घेतले आणि तेथून काढता पाय घेतला.
(हेही वाचाः … म्हणून विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी झालं स्थगित!)
काय झाले नेमके?
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली असून, ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे इतके गंभीर आरोप असताना नैतिकतेच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारने मलिकांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी मलिकांचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचे बॅनर सभागृहाबाहेर उभे केले आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली. या बॅनरवर भाजप आमदार सही करत असताना, त्यांनी नरहरी झिरवळ यांना देखील सही करायची विनंती केली.
…आणि केली स्वाक्षरी
झिरवळ सभागृहात प्रवेश करत असताना पाय-यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. या गदारोळात झिरवळ यांनी पेन घेतले आणि बॅनरवर सही केली. आता झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार असल्यामुळे त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात स्वाक्षरी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
(हेही वाचाः महाविकास आघाडी सरकारनेच ओबीसी समाजाचे आरक्षण हिरावून घेतले!)
आदित्य ठाकरेंनी पेन घेतलं आणि…
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात प्रवेश करत असताना सुद्धा त्यांच्या हातात स्वाक्षरीसाठी पेन देण्यात आलं. आदित्य ठाकरेंनी हातात पेन घेतलं खरं पण बॅनरकडे न वळता त्यांनी सभागृहाच्या दिशेने पावले उचलली.
Join Our WhatsApp Community