वीर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी

175

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्याची मागणी शिंदे- फडणवीस सरकारकडे केली आहे.

पुरवणी मागण्यांवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान सहभाग घेताना, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांनी भगूरमधील सावरकर स्मारकाचा उल्लेख केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेले भगूर गाव आपल्या मतदारसंघात येते याचा अभिमान वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, सावरकरांचा जाज्वल्य इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर जनतेसमोर येण्यासाठी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक भगूर गावात उभे राहिले पाहिजे. यासाठी शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करावी, अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली. त्याचबरोबर भगूर गावातून दारणा नदीतून जे दूषित पाणी वाहून शेती आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठीदेखील एक प्रकल्प मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

( हेही वाचा: राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मोठा दिलासा; 21 शूगर समुहाची याचिका फेटाळली )

आई आणि लोकप्रतिनिधी अशी दुहेरी जबाबदारी 

काही दिवसांपूर्वी आमदार सरोज अहिरे या आपल्या अडिच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात पोहोचल्या होत्या. विधान भवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात आपला मुलगा प्रशंसकला ठेवून त्या विधासभेच्या कामकाजात सहभागी झाल्या. मतदार संघाचे प्रश्न महत्त्वाचे असून, ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.