अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र… केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

150

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाल्यामुळे राज्य सरकारकडून अनलॉक मिशन हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली असून 22 ऑक्टोबर पासून राज्यातील सिनेमा व नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याबाबतच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नाट्यगृहे 100 टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली आहे.

काय आहे पत्रात?

राज्यातील थिएटर्स पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे कलावंतांना दिलासा मिळाला आहे. परंतु 50 टक्के क्षमेतेने सिनेमा व नाट्यगृहे सुरू केल्यामुळे कलावंतांचे झालेले नुकसान भरुन निघणार नाही. कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता ती सुधारण्यासाठी थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

(हेही वाचाः राज्य सरकारचे ‘मिशन अनलॉक’: आता थिएटर्सचे दरवाजेही उघडणार)

सलग बैठकव्यवस्था करुन द्यावी

कलावंतांसह तांत्रिक कर्मचा-यांचे लॉकडाऊनच्या काळात फार मोठे नुकसान झाले आहे. आता ट्रेन, बसेससह सार्वजनिक वाहतूक, मॉल्स तसेच इतर ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ थिएटर्सना टक्के क्षमतेची अट ठेवणे हे व्यावसायिकदृष्ट्या मनोरंजन क्षेत्रासाठी हानिकारक आहे. म्हणूनच दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना नाट्य तसेच सिनेमागृहात एक आड एक बैठक व्यवस्थेऐवजी सलग वैठकव्यवस्था द्यावी अशी सुधारणा नियमावलीत करावी, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे.

(हेही वाचाः सरकार पाडण्यासाठी मला ऑफर दिल्या!)

चाचणी करुन प्रवेश मिळणार

दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत प्रेक्षकांसाठी सिनेमा व नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सभागृहात प्रवेश देताना प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची जबाबदारी असेल. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.