राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचंही म्हटलं जात आहे. याचबाबत आता स्वतः सुप्रिया सुळे यांनी विधान केलं आहे. मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही, पण 2024 ची लोकसभा निवडणूक मी बारामतीतून लढवणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
मी पदासाठी काम करत नाही
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांची सोमवारी भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मी पदासाठी कोणतंही काम करत नाही. मुख्यमंत्री पदासाठी आपण इच्छुक नाही. पण 2024 ची लोकसभा निवडणूक मला बारामतीतूनच लढवायची आहे, तशी मागणी मी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचाः मला वाटतं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावं, शिवसेनेचा राष्ट्रवादीला टोला)
धनंजय मुंडेंचे विधान
भविष्यात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. राज्यात उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. पण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन पक्ष होईल तेव्हा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे विधान धनंजय मुंडे यांनी केले होते.
Join Our WhatsApp Community