गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे राष्ट्रवादीच्या अनेक घडामोडींचे केंद्र बनले आहे. पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी युवक-युवतींनी तिथे ठिय्या मांडला आहे. आज अजित पवार वाय बी चव्हाण सेंटर येथे आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले. राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष व्हायला आवडेल का? शरद पवारांनी जर ठरवले तर पक्षाची सूत्रे हाती घेणार का? असे प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले. तेव्हा अजित पवार संतापले.
पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, अरे बाबा माझ्या अध्यक्ष होण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी अध्यक्ष होणार नाही…असे अजित पवार म्हणाले. त्यावर शरद पवार यांनी जर तुमच्याकडे जबाबदारी द्यायचे ठरवले तर तुम्ही ती जबाबदारी घेणार का? असे विचारल्यावर अजित पवार म्हणाले, माझ्या मनात तो विचारही नाही आणि अध्यक्षपदाबाबत मला रसही नाही. त्यामुळे मी तो विचार करु शकत नाही.
(हेही वाचा हुकूमशाही प्रवृत्तीचे कोण ते अडीच वर्षांच्या सत्तेत बघितले; बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर)
राष्ट्रवादीचा अध्यक्ष शुक्रवारी ठरणार, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
पवारांच्या निवृत्तीनंतर नवा अध्यक्ष ठरविण्यासाठी त्यांनी एक समिती जाहीर केली आहे. या समितीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. या समितीची शुक्रवारी, ५ मे रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी समिती मागणी करणार आहे. पण जर पवारांनी निर्णय मागे घेतला नाही, तर नवा अध्यक्ष निवडीचे आव्हान समितीपुढे असणार आहे. सुप्रिया सुळे यांनी देश पातळीवर काम करावे तर महाराष्ट्रात अजित पवार यांच्याकडे पक्ष सोपवावा, असे माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केले होते.
Join Our WhatsApp Community