राजकीय यश म्हणजे नेमकं काय असतं असा प्रश्न कुणी विचारला तर आपल्या मनात पहिली प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उभी राहते. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा स्वयंसेवक होतो, मग एका पक्षाचा कार्यकर्ता होतो, त्यानंतर पदाधिकारी होतो, मुख्यमंत्री होतो आणि पंतप्रधानपदावर विराजमान होतो. याला यश म्हणतात. मोदींनी मागे एकदा शरद पवार यांना गुरु म्हणून संबोधले होते.
आता मोदींच्या या गुरुंची कारकीर्द म्हणजे उतरता क्रम आहे. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला ५० हून अधिक वर्षे झाली आहेत. या ५० वर्षांत त्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार आता त्यांनीच गांभीर्याने करण्याची गरज आहे. आपण ज्यांच्यावर उपकार केले आहेत, अशा लोकांकडून स्वतःला जाणता राजा किंवा मोठा राजकारणी म्हणवून घेणे यातच समाधान मानायचे की आपल्या कर्तृत्वाचे विश्लेषण करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
(हेही वाचा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे हिंदू तरुण ५ दिवस होते तुरुंगात )
शरद पवार यांची राजकारणातली सर्वात ताजी खेळी म्हणजे फडणवीसांना फसवून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणे. ही खेळी खेळल्यानंतर शरद पवारांचे चाहते आणि महाराष्ट्रातले सदैव उपाशी असलेले चाय-बिस्कुट पत्रकार फारच खुश झाले होते. साहेबांचं राजकारण कोणाला कळत नाही वगैरे वल्गना करण्यात आल्या होत्या. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वात वाईट काळ ठरला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सपशेल नापास ठरले. यासाठी शरद पवारांना जबाबदार ठरवता येईल. कारण उद्धव ठाकरे स्वतःच्या बळावर इतकं मोठं पद कधीही मिळवू शकले नसते. आता तर ते शिवसेनेचे अध्यक्षही राहिले नाहीत.
सांगायचे तात्पर्य या खेळीने चाय-बिस्कुट आणि त्यांची टोळी सुखावली होती, पण अनुभवाने पवारांपेक्षा खूपच लहान असलेल्या देवेंद्र फडणवीस या कर्तृत्ववान पुरुषाने पवारांना सहज मात दिली. त्यांच्या नाकासमोरुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवले, इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांची मान्यताही रद्द झाली. हा उद्धव ठाकरेंचा नव्हे आता तर सरद पवारांचा अपमान होता. आता शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाला आहे. विरोधक त्यांच्या पक्षाला साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून चिडवायचे, पण त्या चिडवण्यात तथ्य होते हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे पवारांनी ज्यांच्यावर उपकार केले आहेत, त्यांनी पवारांच्या यशस्वी राजकारणाचे कितीही दाखले दिले तरी पवारांचे खरे दुःख त्यांना कळणार आहे काय? ’कालचा पोरगा’ आपल्याला हरवतो हे दुःख किती तरी मोठे आहे. कोणाला आपल्यापेक्षा ज्युनियर असलेल्या व्यक्तीकडून हरायला आवडेल? म्हणूनच पवारांचं दुःख आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या चाहत्यांना ते दुःख कळत नाही यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं?
Join Our WhatsApp Community