राणेंचे सत्ताबदलाचे भाकीत! शरद पवार तडकाफडकी दिल्लीत

सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत आहेत, दुसरीकडे केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांनी मार्च महिन्यात राज्यात सत्तांतर होईल, असे भाकीत केले, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. या सर्व घटनांचा आता एकमेकांशी संबंध जोडला जात आहे. गुरुवारीच चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.

नेमके कारण गुलदस्त्यात!

शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हेदेखील राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचेही बोलले जात आहे. मात्र नेमके कारण गुलदस्त्यात आहे.

(हेही वाचा महाराष्ट्रात चक्क ९५ टक्के प्रसूती झाल्या आरोग्य केंद्रात!)

चर्चेला उधाण

दुसरीकडे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत खलबते सुरु आहेत. दोन्ही नेते भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत का? राज्यात महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका येत आहेत. त्यावर भाजपाची दिल्लीत भूमिका ठरते का? यात पवारांचा सहभाग असणार का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here