राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाला, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच केला होता. आता राज ठाकरे यांच्या या टीकेला खुद्द शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार यांचे लिखाण वाचावे, असे शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्याबद्दल जास्त न बोललेलेच बरे, असेही पवार म्हणाले. सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले पवार?
घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे आरक्षणासाठी सरकारने पाऊल टाकले, असा लोकांचा गैरसमज झाला. ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. 1992 मध्ये 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार खटल्यात आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. केंद्राने नंतर घटनादुरुस्ती करुन 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली. ओबीसींची यादी तयार करुन राज्य आरक्षणाचा निर्णय घेऊ शकतात, अशी केंद्राने भूमिका मांडली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असे पवार म्हणाले.
(हेही वाचाः राणेंनंतर आता भारती पवारही अधिकाऱ्यांवर नाराज)
वस्तुस्थिती सांगण्याची गरज
या घटनादुरुस्तीमुळे केवळ ओबीसींची यादी तयार करता येईल, पण आरक्षण देता येणार नाही. आरक्षण देण्यासाठी थेट 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची गरज आहे. ते केंद्राच्या हातात आहे, हे आम्ही जनतेला समजावून सांगू, असेही त्यांनी सांगितले. लोकांचे जनमत तयार करावे लागेल. लोकांच्या, तरुण मंडळाच्या, विद्यार्थ्यांमध्ये सभा घ्याव्या लागतील त्यांना सांगावे लागेल, ही वस्तुस्थिती नाही. त्यांना खरे काय ते सांगावे लागेल. यांच्यात काही नैराश्य नव्या पिढीला येईल. हे नैराश्य समाजाच्या दृष्टीने चांगले नाही, असे शरद पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community