राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भेटी-गाठीचे सत्र जोरात सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात नेमकी काय उलथापालथ सुरू आहे, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत वैयक्तिक भेट घेतल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या या अचानक दिल्ली भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
(हेही वाचाः भेटी-गाठीचे राजकारण)
काय दडलंय दिल्ली भेटीत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा रविवारी दुपारी विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केरळमधील प्रमुख नेत्यांना ते या दौ-यादरम्यान भेटणार असल्याचे कळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या वेगवान हालचाली बघता, त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार का, याकडे आता महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांचेही लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवारांचा आत्मविश्वास )
पवारांनी केले होते महाविकास आघाडीचे कौतुक
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी महाविकास आघाडी गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे सांगत, या सरकारला पाच वर्ष कोणीही हलवू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेचे तोंडभरुन कौतुकही केले होते. पण एकीकडे शरद पवार महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे असं सांगत असतानाच, या आघाडीतील बिघाडी अनेकदा समोर आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांमधील नेत्यांचे वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करत असल्याचे सांगत, शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घ्यायला हवे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. त्यामुळे हे पत्र महाविकास आघाडीतील शिवसेनेची नाराजी व्यक्त करणारे आहे.
(हेही वाचाः सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप… म्हणाले, शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे!)
पवार-किशोर भेट
मराठा आरक्षणाबरोबर राज्यातील विविध विषयांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्धा तास वैयक्तिक चर्चा झाली होती. त्यानंतर दोनच दिवसांत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून कसे रोखता येईल आणि या निवडणुकीसाठी कोणता चेहरा वापरणे योग्य असेल, याबाबत महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाली. या भेटीबाबतही अनेक राजकीय तर्क वितर्क काढण्यात आले. त्यामुळे त्यानंतर आता पवारांची ही दिल्लीवारी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उभी करणारी आहे, असे बोलले जात आहे.
(हेही वाचाः पवार-किशोर यांच्या भेटीत नेमकं काय शिजलं? वाचा…)
Join Our WhatsApp Community