पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचनालयाने (ईडी) अटक केलेल्या शिवसेना नेते व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांच्या मातोश्री व कुटुंबाची भेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली. परंतु ईडीच्या अटकेनंतर राऊत कुटुंब संकटात असताना त्यांचे राजकीय गुरु आणि ज्यांनी त्यांना आपला मानस पुत्र मानले ते राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार किंवा त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राऊत यांनी मलिक कुटुंबाची भेट घेतली होती. मात्र, ज्या पवार कुटुंबावर नितांत प्रेम केले त्याच्याकडून राऊत यांच्या कुटुंबाची साधी भेटही पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी न घेतल्याने राऊत यांच्यावरील प्रेम आटलं का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री? Google च्या गोंधळामुळे नेटिझन्समध्ये चर्चा)
शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाते सर्वश्रुत आहे. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पवार यांचे मानसपूत्र म्हणूनच राऊत यांची ओळख असून सन २०१९च्या निवडणुका शिवसेना आणि भाजप युतीमध्ये झालेल्या असतानाही या निवडणूक निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे महाविकास सरकार हे कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर स्थापन झाले. हे सरकार स्थापन होण्यामागे राऊत यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली, यामागेही पवार यांचाच मोठा हात होता आणि पवार यांच्यामुळे राऊत यांनी ही भूमिका पार पाडत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवले होते. त्यानंतर केंद्रातील भाजप सरकार विरोधात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवीन आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यातही पवारांच्या मदतीने शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून राऊत हे त्या आघाडीत सामील झाले होते.
(हेही वाचा – पुणे-लोणावळा लोकल 22 ऑगस्टपर्यंत पुन्हा सेवेत होणार दाखल)
तसेच दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी सतत राबता असलेल्या राऊत यांच्या मुलीच्या लग्नात संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रपणे डान्स केलेलाही पाहिला आहे. एवढेच नाही राज्य सभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर संजय राऊत यांनी वर्षावर जात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याऐवजी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जात आशिर्वाद घेतले होते.
परंतु संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळीच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने अटक केल्यानंतर पवार किंवा त्यांच्या कुटुंबांनी त्यांची साधी विचारपूसही केली नसल्याची माहिती मिळत आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राऊत यांच्या मातोश्रीसह त्यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबातील सदस्यांची घरी जावून विचारपूस केली. परंतु उध्दव ठाकरे यांच्या पेक्षा ज्यांच्यावर राऊत यांनी नितांत प्रेम केली आणि ज्यांच्याप्रती जास्त निष्ठा आहे, ते पवार आणि त्यांचे कुटुंबीय राऊत यांच्या कुटुंबांच्या भेटीलाही आले नाही. त्यामुळे पवार यांनी राऊत यांचा केवळ वापर केला का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत, आज शरद पवार हे राऊत यांच्यावर खुश असलेले दिसतात, पण ते कधी टांगले जातील हेसुध्दा कळणार नाही, असा टोला मारला होता. त्यामुळे राऊत आणि पवार यांच्या मैत्रीवर राज ठाकरे यांनी केलेले विधानही आज तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे.
Join Our WhatsApp Community