राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर मोठी खलबतं सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी या दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीत संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. या दोघांत साधारण २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
पवार- मोदींच्या भेटीवर अनेक तर्क-वितर्क
या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी गेल्या वर्षी १७ जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. मात्र बुधवारी झालेल्या या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही. पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने या भेटीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पवारांची भेट अत्यंत मानली जात आहे. मात्र, या धाडसत्रावर दोन्ही नेत्यांच्या भेटीत चर्चा झाली की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
मोदींच्या भेटीनंतर पवारांची पत्रकार परिषद
महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार मंगळवारी दिल्लीत आले होते. अभ्यास वर्गासाठी हे आमदार दिल्लीत आले होते. महाराष्ट्रातील या आमदार, खासदारांसाठी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम होता. तर मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. राज्य सरकार कोणत्याही परिस्थिती कोसळणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या पार्श्वभूमीवर बुधवारी ४ वाजता पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आज शरद पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community