राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत भारत आणि श्रीलंकेची तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीलंकेत एका कुटुंबाकडे सत्तेचे केंद्रीकरण झाल्यामुळे आज श्रीलंकेवर ही वेळ आली आहे. त्यामुळे भारतातील शासनकर्त्यांनी देखील हे लक्षात घ्यायला हवं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पवार कुटुंबीयांचं वर्चस्व असल्यामुळे हा सल्ला पवारांनी स्वतः देखील लक्षात घ्यायला हवा, असे आता बोलले जात आहे.
काय म्हणाले पवार?
श्रीलंकेत राष्ट्रपती,पंतप्रधान,संरक्षण मंत्री, अर्थमंत्री या पदांवर एकाच कुटुंबातील सदस्य गेली अनेक वर्षे विराजमान होते. त्यामुळे एका कुटुंबाकडे सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्याचाच परिणाम म्हणून श्रीलंकेतील जनतेचा असंतोष उफाळून आला आणि श्रीलंकेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. भारतात जरी आता ही परिस्थिती नसली तरी सत्तेवर असणा-यांनी हे लक्षात घ्यायला हवं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः ‘तारीख पे तारीख…’ राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर)
पवार कुटुंबीयांचे वर्चस्व
तसं पहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि नव्या पिढीतील रोहित पवार यांचेच वर्चस्व आहे. 81 वर्षीय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, गेली अनेक वर्ष अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे बारामतीतून आमदार आणि खासदार होत आहेत. तर रोहित पवार हे सुद्धा राज्याच्या राजकाणात सक्रीय आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही एकाच कुटुंबाच्या हातात असल्याचे दिसून येते.
Join Our WhatsApp Community