राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. पवार जातीय भांडण लावतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून राज्यात जातीवादाला खतपाणी मिळाले, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. आता यावर प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का? अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
आमच्यावर यशवंतरावांचे संस्कार
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आमच्यावर यंशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या कृतीत नम्रता होती. सहनशीलता होती. अल्टिमेटम हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हता. त्यामुळे या शब्दाचा मला अभ्यास नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
( हेही वाचा: राज ठाकरेंविरोधात नाॅनबेलेबल वाॅरंट जारी )
चीनच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळेंची फटकेबाजी
सामन्याच्या अग्रलेखातून चीनच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चीनचा विषय महत्त्वाचा आहे. संसदेत मी वारंवार युद्धावर बोलत असते. युद्ध कोणी जिंकत नाही. युद्ध हा कोणत्याही प्रश्नाचा पर्याय नाही, हे मी संसदेत वारंवार बोलत होते. 56 इंचची छाती वगैरे भाषणापुरतेच छान वाटतं. एक माहौल असतो त्यावेळी ते बोलत होते. पण वास्तवापासून दूर असतात, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community