मुंबईत काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस घेतेय प्रेरणा!

काँग्रेसच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत जाग आली. त्यामुळे केंद्राच्या महागाई विरोधात कुर्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदालन करण्यात आले.

140

सर्वच पक्ष मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र शांत बसलेला दिसून येत होता. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिका निवडणुकीकरता झपाटून काम करण्याऐवजी आदेशाची वाट पाहत गप्प बसतात की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असली, तरीही मुंबई राष्ट्रवादीचे अस्तित्व शून्य आहे. मुंबई महापालिकेसाठी कालपर्यंत सेनेशी युती करण्याच्या गोष्टी करणारा राष्ट्रवादी काँग्रेसला आता मात्र स्वबळाची भाषा करणारी काँग्रेस प्रेरणा देऊ लागली आहे. काँग्रेसच्या आंदोलनामुळे प्रेरित होत मुंबईत आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन करत कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून टाकायला सुरुवात केली आहे.

…आणि काँग्रेस पक्ष पेटून उठला!

भाजपच्या शक्तीपुढे निपचित पडलेल्या काँग्रेस पक्षाला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हत्तीचे बळ आले आहे. त्यातच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असलेल्या आणि पक्षाच्या ध्येय धोरणाची जाण असलेल्या भाई जगताप यांची निवड झाली. तसेच आक्रमक नेतृत्व असलेल्या नाना पटोले यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने सोपवल्यानंतर या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी पसरली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा काँग्रेसने दिला आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली जाईल, असे विधान केले. त्यामुळे काँग्रेस पक्ष पेटून उठला. आधी २२७ वॉर्डाना भेटी देत कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरे लॉकडाऊन लावण्यात आले. त्यानंतर दुसरी लाट कमी होत असताना भाई जगताप यांनी २२७ वॉर्डात महागाई विरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा देत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी करत कामाला जुंपले आहे.

(हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासे विक्रेत्यांचे कुठे होणार पुनर्वसन?)

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडली!

परंतु काँग्रेसच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत जाग आली. त्यामुळे केंद्राच्या महागाई विरोधात कुर्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदालन करण्यात आले. माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्यासह शिवाजीराव नलावडे, रविंद्र पवार यांच्यासह महापालिका गटनेत्या राखी जाधव यांच्यासह पक्षाच्यावतीने आंदोलन करत रस्त्यांवरच चुल मांडून प्रतिकात्मक जेवण बनवण्याचा प्रयत्न केला. महागाई विरोधात ज्याप्रकारे काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन केले जात आहे, त्यातुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील हे पहिले आंदोलन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता केंद्रातील सरकार विरोधात आंदोलन करून मुंबईसह राज्य ढवळून काढायचा निर्धार केला आहे. त्यामुळे शांत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता मुंबईतही सक्रीय होत असल्याचे पाहायला मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.