अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. ते राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना पक्षाचे नवे प्रतोद आणि विरोधी पक्षनेते म्हणून निवडण्यात आलं आहे.
(हेही वाचा – एकनाथ शिंदेंसह सोळा आमदार अपात्रतेबाबत लवकरच होणार निर्णय)
राष्ट्रवादीसह जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का
मात्र त्यानंतर आव्हाडांना मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते म्हणून आव्हाडांचं नाव घोषित होताच माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा प्रमुख आनंद परांजपे अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहेत. आनंद परांजपे यांनी थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर हजेरी लावली.
जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली फूट रोखण्याचं मोठं आव्हान आता शरद पवारांसमोर आहे. दरम्यान अजित पवार यांनी 8 नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज ते पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.