बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या श्रेयात राष्ट्रवादीचीही हिस्सेदारी! शुभारंभास पवार उपस्थित राहणार

या माध्यमातून वरळीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहेत.

122

मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, बीडीडीकरांचे घरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ वरळीपासून होणार आहे. या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. परंतु, दहा वर्षांपूर्वी वरळी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे बीडीडीकरांच्या मतात आपलाही हक्क सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार हेही उपस्थित राहणार आहेत. शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थित हा शुभारंभ होणार आहे. आव्हाड यांनी पुढाकार घेत या प्रकल्पाचे काम पुढे रेटल्याने, श्रेयाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसनेही हिस्सेदारी सांगितल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

वरळीत पुन्हा ताकद वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून, शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण(नोडल एजन्सी) म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांत बांधल्या जाणाऱ्या इमारती या भूकंपरोधक असणार आहेत. वरळी येथील जांबोरी मैदान येथे रविवारी दुपारी ११.३० वाजता हा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वरळी हा पूर्वी शिवसेनेचा गड असला, तरी पुढे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी काबिज केला होता. परंतु अहिर यांनी आता शिवसेनेशी घरोबा केला आहे, त्यामुळे वरळीत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या शुभारंभात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांना खास निमंत्रित करत, याचे श्रेय आपल्या पक्षाकडे घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या माध्यमातून वरळीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहेत.

(हेही वाचाः रेनकोट, छत्रीच्या नावाखाली दादरमधील दुकाने शनिवारीही सुरू)

बीडीडीकरांचा जीवनमानाचा दर्जा उंचावणार

मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे. शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत. म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या १६० चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून ५०० चौ. फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार असून, येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनीयुक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. ज्यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.

भूकंपरोधक इमारती

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे १२१ चाळी असून, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिका(निवासी ९३९४ + अनिवासी २९५) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + ४० मजल्यांच्या ३३ पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार असून रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये ८०० बाय ८०० मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसवण्यात येणार असून, खिडक्यांसाठी पावडर कोटिंगच्या अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये ३ पॅसेंजर लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट व १ फायर लिफ्टची सुविधा असणार आहे. पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ अधिक ६ मजली पोडियम पार्किंग व दोन प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंपरोधक असणार आहेत.

(हेही वाचाः दरड दुर्घटना: जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन झाले अलर्ट)

बीडीडी चाळीचा इतिहास

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन १९२० ते १९२४ या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली . या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ , नायगाव आणि शिवडी येथे सुमारे ९२ एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली . या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडीचाळींमध्ये तर अनेक साहित्यिक , राजकीय नेते, कलाकार, अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.