शरद पवार यांच्या स्वाभिमान सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) अजित पवार गट ‘महाराष्ट्र परिक्रमा’ करणार आहे. मात्र, त्याचे नेतृत्व कोणाकडे द्यावे, यावरून अजित पवार गटात सध्या धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण राष्ट्रवादीच (NCP) भाजपसोबत सत्तेत यावी आणि पक्षफूट टाळावी, अशी आग्रहपूर्वक मागणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची अनेक वेळा मनधरणी केली. मात्र, शरद पवार भाजपाविरोधी भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता अजित पवार गटाने शरद पवारांना उत्तरसभांमधून आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी २७ ऑगस्टपासून अजित पवार गटाचे (NCP) नेते ‘महाराष्ट्र परिक्रमा’ करणार आहेत. याद्वारे ते राज्याच्या विकासासाठी भाजपासोबत जाण्याची आपली भूमिका कशी रास्त आहे, हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील. तसेच आजवर आपल्यावर कसा अन्याय झाला, याचा पाढाही वाचतील. दरम्यान, बंडखोरांच्या मतदारसंघात शरद पवार सभा घेत आहेत. पहिली सभा भुजबळांच्या येवल्यात, दुसरी धनंजय मुंडेंचा जिल्हा असलेल्या बीडमध्ये घेतली. ४ सप्टेंबरला जळगावात, त्यानंतर पुणे आणि कोल्हापुरात ते सभा घेणार आहेत.
(हेही वाचा – Senate Election : मुंबई विद्यापीठानं रातोरात सिनेटची निवडणूक केली स्थगित)
त्यामुळे या सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवारांनी (NCP) धनंजय मुंडे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली होती. युवा नेतृत्व आणि प्रभावी वक्तृत्वामुळे मतदारांची त्यांना पसंती मिळेल, असा त्यांना विश्वास होता. मात्र, धनंजय यांना इतकी मोठी जबाबदारी देण्यास पक्षातूनच विरोध होऊ लागला आहे. आधीच त्यांना कृषी सारखे महत्त्वाचे मंत्रालय दिल्याने अनेकजण नाराज आहेत. त्यात आता ज्येष्ठ नेत्यांकडूनही विरोध होऊ लागल्याने अजित पवारांसमोर नवा पेच उद्भवला आहे.
ज्येष्ठांची पसंती कोणाला?
देशातील सर्वात अनुभवी राजकारणी असलेल्या शरद पवारांना (NCP) उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडेंसारख्या नवख्याला मैदानात उतरवण्याला छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटलांनी विरोध दर्शवला आहे. स्वतः अजित पवार, छगन भुजबळ किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशी ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. मात्र, तटकरे यांनी त्यापासून आधीच अंग काढून घेतले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community