काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचीही मदत! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार 2 कोटी

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये, तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे.

काँग्रेसने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदतीचा हात पुढे केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये, तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

राज्याच्या तिजोरीवरील भार हलका करण्यासाठी निर्णय

महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने, राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे. त्याचमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोनासोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये, तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः सरकारकडून मदत जाहीर, पण अजून पोहचलीच नाही? लॉकडाऊनच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह!)

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या सहाय्यासाठी तत्पर असल्याचे सांगतानाच, या निधीचा स्वीकार करावा अशी विनंती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजित पवार, ट्रस्टी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ट्रस्टी आणि खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केली आहे.

काँग्रेसनेही केली मदत

सर्वांचे मोफत लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही होतो. तशी भूमिका काँग्रेस पक्षाची कायम होती. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झाले आहे. त्यामुळे आताही आम्ही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार असल्याने, मी माझे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे थोरात म्हणाले. तसेच काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले होते. एवढेच नाही तर नागरिकांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here