उत्तर प्रदेशात सिराज महेंद्र हे राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. तसेच भाजपमधून आमदार मौर्य हे समाजवादी पक्षात गेले आहेत. ही सुरुवात आहे आणि ती थांबणारी नाही. अजून १३ आमदार भाजप सोडून समाजवादी पक्षात जाणार आहेत. दररोज नवनवीन चेहरे समोर येतील जे भाजपाला सोडून जातील, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेवर येईल. तर पंजाबमध्ये ज्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे तिथे काँग्रेसचे गणित बिघडले आहे, त्यामुळे तिथे काँग्रेसविषयी चित्र अस्थिर बनेल, अशी भाकीते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
गोव्याबाबत २ दिवसांत निर्णय…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५ राज्यांपैकी ३ राज्यांत उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर येथे निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत ५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. गोव्यात तृणमूल आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरु आहे, त्यावर २ दिवसांत अंतिम निर्णय होईल, मात्र गोव्यातही काँग्रेसने सोबत यावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल पटेल आणि शिवसेनेच्या वतीने संजय राऊत हे बोलणी करत आहेत. काँग्रेसने याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेसोबत महाराष्ट्रात आम्ही एकत्र काम करत आहोत, त्यामुळे गोव्यातही भाजपाला बाजूला करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.
(हेही वाचा लोहगडाचा होतोय मलंगगड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)
योगींचे ते वक्तव्य अडचणीत आणणार…
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला २० टक्के सोडून ८० टक्के समाजाचा पाठिंबा आहे, हे वक्तव्य धर्मांध वृत्तीचे आहे, त्यामुळे भाजपाची भूमिका स्पष्ट झाली आहे, त्याचा परिणाम निवडणुकीत होईल, असेही पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने जे नियम बनवले आहेत, त्यामुळे केवळ डिजिटल प्रचार करावा लागणार आहे आणि त्यासाठी भाजपाची जोरदार तयारी आहे, याउलट अन्य पक्षांची तयारी नाही. त्यामुळे अन्य पक्षांचे नुकसान होणार आहे, असेही पवार म्हणाले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांची…
पंतप्रधानांच्या सुरक्षेवर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. पंतप्रधान हे एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदादरी केंद्र आणि राज्य या सर्वांची जबाबदारी आहे. जर या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, तर अशा वेळी त्यावर आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे आहे.
Join Our WhatsApp Community