आता राष्ट्रवादीचीही स्वबळाची भाषा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशीही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही.

पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केलेले असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून देखील स्वबळाची भाषा केली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, असे सांगत स्वबळाचा नारा दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीला आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलेले ११४ उमेदवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी सर्वांकडून मतदार संघाचा आढावा घेतला.

काय म्हणाले मलिक?

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशीही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मलिक यांनी स्पष्ट केलं. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतचा डेटा वेळेत मिळाला नाही आणि निवडणुका लागल्या तरी आम्ही ओबीसींना पूर्ण न्याय देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्याठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः किरीट सोमय्यांना केंद्राची ‘पॉवर’!)

काँग्रेसची तयारीही सुरू

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असले, तरी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी काही महिन्यांपूर्वीच केली होती. भाईंच्या या घोषणेनंतर काही मत-मतांतरे देखील समोर आली होती. मात्र भाई जगताप यांनी केलेली ती फक्त घोषणा नसून, काँग्रेसने तशा हालचाली देखील मुंबईत सुरू केल्या आहेत. काँग्रेसच्या मुंबईतील हालचाली बघता, जरी काँग्रेस राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत असली, तरी मुंबई महापालिका निवडणूक मात्र काँग्रेस स्वबळावर लढणार हे निश्चित झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here