जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती, 528 मतं मिळवत विजयी

नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील भाजप पुरस्कृत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. त्यामुळे धनकड हे देशाचे 14वे उपराष्ट्रपती ठरले आहेत.

528 मतांनी विजयी

जगदीप धनकड यांना तब्बल 528 मतं मिळाली असून, काँग्रेस पुरस्कृत यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ 182 मतं मिळाली आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या काळात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मतमोजणीला देखील सुरुवात झाली होती. या निवडणुकीत संसदेच्या एकूण 725 खासदारांनी मतदान केले. त्यापैकी 710 मतं वैध ठरवण्यात आली असून त्यापैकी जगदीप धनकड यांना तब्बल 528 मतं मिळाली आहेत. तर मार्गारेट अल्वा यांना मात्र या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.

असे झाले मतदान

या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. या निवडणुकीवेळी समाजवादी पक्षाच्या 2, शिवसेनेच्या 2 आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या एका खासदाराने अनुपस्थिती लावली. तसेच भाजप खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानासाठी सहभागी होऊ शकले नाहीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here