राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राज्यात ६६ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. वास्तविक ४४ टक्के मतदार मतदानाचा हक्क बजावत नाही, ही शोकांतिका आहे. मतदानाचा टक्का किमान कधीतरी ७५ टक्के तरी पार पाडणार आहे का, असा प्रश्न आहे. मतदानाची कमी टक्केवारी समोर आल्याने यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आता मतदान सक्तीचे करावे, अशी भूमिका मांडली आहे.
रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वांद्रे पूर्वकडील गांधीनगर येथे सहकुटुंब मतदान केले, त्यानंतर त्यांनी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, मतदारांनी सुट्टी घ्यावी अन् मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. लोकशाही सृद्ढ होण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. 80 ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होणे गरजेचे आहे. मात्र, मतदान 50 टक्के किंवा त्या दरम्यान होत असल्याने मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले.
मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी बुथची संख्या वाढवावी आणि हजार मतदारांऐवजी एका बुथवर 500 मतदारांची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी आपण निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. ‘मतदान करा व मग जा आपल्या घरा’ असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. सरकारने केलेल्या कामामुळे महायुतीला 165 जागांवर विजय मिळेल आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community