भारतीय भाषांचे ज्ञान संस्कृतमध्ये नेण्याची गरज – सरसंघचालक

148

संस्कृत भाषेतील ग्रंथांचा विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद होऊन ज्ञान, साहित्याचा प्रसार प्रचार झाला. वर्तमानात देशाच्या एकात्मतेचे सूत्र बळकट करण्यासाठी प्रांतीय भाषांमधील ज्ञान, साहित्याचा पुन्हा संस्कृतमध्ये अनुवाद होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधुकर पेन्ना यांनी ज्ञानेश्वरीचा संस्कृतमध्ये अनुवाद केला. त्यानिमित्ताने स्थानिक संत ज्ञानेश्वर सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. भागवत बोलत होते.

भगवद्गीता हा अर्क

याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, संस्कृत भाषेतील ज्ञान सर्वसामान्यांच्या भाषेत आणण्याचे काम देशातील सर्वच भाषेतील संतांनी केले. यामागचा हेतू संस्कृत भाषेतील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेणे असा होता. सर्वच ग्रथांबद्दल असेच झाले असे नाही. परंतु, भगवद् गीता हा अर्क आहे. वेदांचा विस्तार उपनिषदांमध्ये असून उपनिषदांचे सार श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. महात्मा गांधी म्हणायचे की, हिंदूत्व म्हणजे सत्याचा शोध असून तो सतत चालणारा आहे. आपल्याकडे थेअरी मांडत नसून तुम्ही स्वतः अनुभव घ्या असे सांगण्यात आलेय. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचे भाष्य हजार ओव्यांचे झाले. परंतु, कालौघात आपली गरज बदलली आहे.

संत साहित्यात जे काही आहे ते प्रत्यक्ष

संत साहित्य आणि पंत साहित्य यात फरक आहे. संत साहित्य हे अनुभवातून येते विद्वत्तेतून येत नाही. वेदांतात न सुटणाऱ्या निरगाठी असू शकतात मात्र, संत साहित्यात निरगाठी नाहीत. कारण संत साहित्यात जे काही आहे ते प्रत्यक्ष आहे. संत साहित्य अनुभवातून आल्यामुळे सोपे असते. हे सर्वच भाषांच्या बाबतीत लागू पडते. भारतात आज थिरूवल्लूवरांच्या साहित्याचा अनुवाद होणे आवश्यक आहे. आज आपल्याला तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगवेगळे वाटतात. परंतु, विविध राज्यातील आणि भाषेतील संतांनी मांडलेले अनुभव, ज्ञान आणि शिकवण एकच आहे. त्यामुळे सर्व भाषेतील उपदेश एकच आहे हे लोकांना तेव्हाच कळेल जेव्हा त्याचा संस्कृतमध्ये अनुवाद होईल. कारण संस्कृत ही प्रत्येकाला येते. वाल्मिकी रामायण हे संस्कृतमध्ये असल्यामुळे त्याचे भाषांतर मिझो भाषेत देखील झाले आहे. तेव्हा विविध भाषेतील संताच्या साहित्याचा संस्कृत अनुवाद झाल्यास आपल्या एकात्मतेचे सूत्र बळकट होईल. भारताच्या एकात्मतेचे सूत्र बळकट झाल्यास पसायदानातील मागणे पूर्णत्वास जाईल. कारण भारत ही भोग भूमी नसून कर्मभूमी आहे. तेव्हा भारतीय भाषांमधील संतनिर्मीत ज्ञान साहित्य संस्कृतमध्ये अनुवादित झाले तर भारत विश्वगुरू बनेल कारण भारताने ज्ञानाच्या बळावर त्यास्थानी पोहचणे ही काळाची गरज असल्याचे भागवत यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.