‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेला वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरला, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या या पितापुत्रांविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स बजावला होता. या दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला, मात्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन सोमवार ११ एप्रिलला फेटाळला व त्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा अर्ज सुद्धा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता सोमय्या पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली असून, या दोघांना अटक होणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या सोमय्या पिता-पुत्र हे दोघे गायब असून, किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ जारी करत या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : मुंबई जागतिक स्तरावर वृक्षनगरी! )
पोलिसांकडून अटकेची तयारी सुरु
आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांच्या विरोधात राज्य सरकारला पुरावे दिले. त्यानुसार आर्थिक गैरव्यवहार विरोधी विभागाने याची दखल घेत सोमय्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स पाठवला आहे. या समन्सनुसार, किरीट सोमय्या यांना 9 एप्रिल रोजी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र सोमय्या आलेच नाही. त्यांनी सोमवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सोमय्या यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुंदरगी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. दुसरीकडे पोलिसांनीही सोमय्यांना अटक करण्याची तयारी केली आहे.
Join Our WhatsApp Community