नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग म्हणजे विकासाची भाग्यरेखा – मुख्यमंत्री

188

नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर आपले सरकार भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

( हेही वाचा : अचानक हृदय कसे बंद पडते…प्राथमिक उपचाराबाबत जनजागृतीसाठी महापालिकेचा पुढाकार )

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी – अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते. दिवंगत गोपिनाथरावांनी पाहिलेले रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात आले आहे, याचे आपणास विशेष समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आज गोपिनाथराव हयात असते तर त्यांनी हा मार्ग बीड-नगरवासियांना अर्पण केला असता. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. त्यात या रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रगती योजनेत अहमदनगर – बीड – परळी या २६१ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यासाठीच्या ५० टक्के खर्चाच्या तरतुदीची जबाबदारी शासनाने उचलली आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, हा रेल्वे प्रकल्प केवळ दोन भूभाग आणि स्थानकांना जोडणारा नाही, तर माणसे, नातीगोती आणि हृदयांना जोडणारा आहे. या रेल्वेमुळे आता अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना रोजच विकासाची धडधड जाणवणार आहे. विद्यमान शासनाच्या विकासाचा मार्ग वेगाचा राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याबद्दल मध्य रेल्वेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नवीन आष्टी – अहमदनगर नवीन मार्गाविषयी…

66किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन हा अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या 261 कि.मी. नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समसमान म्हणजे प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा आहे.

डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना सुलभ ठरेल. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.

डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता आठवड्यात दररोज धावणार आहे.

कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.