महाराष्ट्रात शनिवारी हनुमान चालिसा पठणावरुन हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. या अटकेनंतर त्यांना तुरुंगात भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या गेले आणि त्यांच्या गाडीवर जमावाकडून हल्ला करण्यात आला. या जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करत, किरीट सोमय्या यांनी दिल्लीत गृहसचिवांनी भेटणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सोमवारी गृहसचिवांची भेट घेतली. 20 मिनीटं झालेल्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले हे चिंताजनक असून महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करुन गरज पडली तर केंद्रीय गृहखात्याची टीम महाराष्ट्रात पाठवू, असे आश्वासन केंद्र सरकारचे गृहसचिव अजय भल्ला यांनी दिल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.
तोपर्यंत माझ्या जीवाला काही होणार नाही
उद्धव ठाकरे आणि परिवाराला आता धोक्याची घंटा आहे. कारण आता ठाकरे सरकारचे 2 डझन घोटाळे बाहेर काढले आहेत. बायकोचे 19 बंगले, मुलांचे घोटाळे, इतरांवर कारवाई हे सगळं चालू असल्याने, आता काहीही करुन किरीट सोमय्यांचा मनसुख हिरेन करायचा असा उद्धव ठाकरे यांचा संकल्प असल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने मला त्यासाठी प्रोटेक्शन दिले आहे. तिनदा वाचलो आहे, आणि मला खात्री आहे. ठाकरे सरकारच्या घोटाळ्याचा अंत होईपर्यंत किरीट सोमय्याच्या जिवाला कोणी हात लावणार नाही. असेही किरीट सोमय्या यांनी गृहसचिवांच्या भेटीनंतर सांगितले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर अमित शहांशी चर्चा केल्याचेही किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
निवेदनातील मागण्या
- मुंबईत शिवसैनिकांनी केलेल्या हल्लयाची केंद्रीय गृहखात्याच्या पथकाकडून चौकशी करा
- सीआयएसएफला मुंबई पोलिसांत आणखी एक एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्या
- सोमय्यांवर हा तिसरा हल्ला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा आढावा घ्या
- गुंड आणि खार पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा
( हेही वाचा: मंगेशकर कुटुंबीयांकडून मराठी माणसाचा अपमान, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली नाराजी )
फडणवीसांच्या पत्रातील मुद्दे
- पोलिसांनी अटक केलेल्या नवनीत आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी गेलेल्या सोमय्यांवर हल्ला झाला
- शिवसैनिकांकडून हल्ला होऊ शकतो, असे सोमय्यांनी पोलिसांना पोलीस ठाण्यातून बाहेर पडण्याआधी सांगितले होते तरीही पोलिसांनी गर्दी हटवली नाही, त्यामुळे सोमय्यांवर हल्ला झााला.
- पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याजवळ हल्ला होणे ही गंभीर बाब
- या घटनाक्रमामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- मुंबई पोलिसांच्या आडून गुंडगिरीचा प्रकार सुरु
- किरीट सोमय्यांना केंद्राने झेड सुरक्षा देऊनही महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस गंभीर नाहीत.
- राजकीय दबावामुळे पोलिसांकडून हल्लेखोरांवर कारवाई नाही
- महाराष्ट्रातील अराजक परिस्थितीची दखल घेऊन कारवाई करा