माजी मुंबई पोलिस आयुक्त पबरबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे आधीच सरकार अडचणीत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारीच विरोधकांना माहिती पोहोचवत असल्याचा सूर, ठाकरे सरकारमध्ये उमटला होता. पोलिस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी कुणाच्या निष्ठा काय आहेत हे तपासण्यात येईल, असे सांगत भाजप आणि संघाशी जवळीक असलेल्या अधिकाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
नाव न घेता गृहमंत्र्यांचा अधिका-यांना सज्जड दम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागला. अँटिलिया बॉम्ब प्रकरणापासून ते परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बपर्यंत घडलेल्या घडामोडींमुळे पोलिस दलाविषयी मोठ्या प्रमाणावर अविश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतलेले दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी त्या अधिकाऱ्यांना नाव न घेताच सज्जड दम दिला. पोलिस दलाचे सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावले टाकणे आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझे काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलिस भरती गतीमान करणे, पोलिस हाऊसिंगसाठी घरे बांधून घेणे, या गोष्टी करायच्या असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः हिंदुस्थान पोस्टच्या बातमीवर शिक्कामोर्तब! दिलीप वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री)
काळ आव्हानात्मक आणि अवघड…
सध्याचा काळ हा आव्हानात्मक आणि अवघड आहे. कोरोनामुळे सर्व पोलिस दल रस्त्यावर किंवा फील्डवर कार्यरत आहे. पोलिस दलाचे काम कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच, कोरोना काळातल्या बंधनांची चोख अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस खात्यावर आहे. याच महिन्यात गुढी पाडवा, रमजान, आंबेडकर जयंती, राम नवमी यांसारखे उत्सव आहेत. हे सण, उत्सव त्या-त्या धर्मीयांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत. सगळ्यांच्या भावना या उत्सवांशी जोडल्या गेल्या आहेत. कोरोनाचा अंदाज पाहिला, तर या महिन्यात परिस्थिती अधिक आव्हानात्मक असणार आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलिस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे देखील वळसे-पाटील यांनी सांगितले.
माहितीसाठी नवी यंत्रणा उभारणार!
वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासाची माहिती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा मानस असल्याचे दिलीप वळसे-पाटील यावेळी म्हणाले. धोरणात्मक बाबींविषयी आणि छोट्या-मोठ्या तपासांबाबत प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरे देण्यासाठी या पुढील काळात स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचा आपला मानस आहे. त्या माध्यमातून योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात!
उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सीबीआय-एनआयएची चौकशी यामध्ये राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील. मात्र, न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात ‘आव्हान’! )