नव्या उद्योगांना आता तत्काळ परवानगी मिळणार; मैत्री विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता

110
एकीकडे महाराष्ट्रातील गुंतवणूक इतर राज्यांमध्ये जात असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना, आता नव्या उद्योगांसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, २०१२ या विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होण्यासह यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार आहे.
त्याशिवाय भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टी.सी.एस. आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क निश्चित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अग्निसुरक्षा विषयक तरतुदींच्या अनुषंगाने सुधारणा केली जाईल. शैक्षणिक इमारतींची उंची ३० मीटर वरुन ४५ मीटर करण्यासह, फायर ऑडिटर/ सल्लागार नेमणूकीची तरतूद करण्याबाबतचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

महत्त्वाचे निर्णय

  • फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. परिसरातील रेल्वे जाळे सक्षम होणार.
  • महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत परिपोषण अनुदानात १हजार २२५ वरुन २५०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय.
  • पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात १० हजार ९७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.
  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार.
  • नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या वापर प्रयोजनाविषयी निर्णय. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था देखील येणार. ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगाराची निर्मिती.

… या घटकांना दिलासा

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. सदर योजना केवळ जिल्हास्तरावरुन अथवा राज्यस्तरावरुन न राबविता सामाजिक न्याय विभागाच्या “अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना पूर्वीची दलित वस्ती सुधार योजना” व “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.