राज्यातील ११५ नगरपरिषदा आणि ९ नगरपंचायतींसाठी नव्याने सोडत काढणार

133

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजूरी दिल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील ११५ नगरपरिषदा आणि ९ नगरपंचायतींसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गुरुवार २८ रोजी मागास प्रवर्ग, मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल, तर ५ ऑगस्टला अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणुका घेण्याचे आदेश

मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊनच राज्य निवडणूक आयोगाने पुढील निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यालयाने २० जुलै २०२२ रोजी दिले आहेत. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मागासवर्ग प्रवर्गाकरिता २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देय असेल. तथापि, नगरपरिषदेतील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असणार नाही. हा आदेश विचारात घेता नगरपरिषदांमध्ये एकूण २१ जागा असल्यास मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार ५.६७ इतक्या जागा देय होतील. मात्र २७ टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही, म्हणजेच ५.६७ करिता फक्त ५ जागा नगरपरिषदांसाठी देय होतील. तसेच नगरपंचायतींमध्ये एकूण निश्चित जागा १७ असल्यामुळे ज्या नगरपंचायतीमध्ये समर्पित मागासवर्ग आयोगाने २७ टक्के जागांची शिफारस केली असेल, तेथे ४.५९ इतक्या जागा येतात. त्यामुळे नगरपंचायतींमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता फक्त ४ जागा देय होतील.

( हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला डावलण्यासाठी भाजपाला दिलेला युतीचा प्रस्ताव! दीपक केसरकरांचा आरोप)

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यामधील महिलांसाठी यापूर्वीच आरक्षण निश्चित करण्यात आले असून, मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा आरक्षित केल्यामुळे या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. मात्र, सर्व साधारण महिलांचे आरक्षण रद्द करून मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यात कोकण मंडळातील १८, नाशिकमधील ६, पुणे १०, औरंगाबाद २३, अमरावती ३१, नागपूरमधील ३६ नगरपालिका आणि नगरपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने ठरविलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार, २६ जुलैला आरक्षणासंदर्भात सूचना प्रसिद्ध केली जाईल. तर शुक्रवारी २८ जुलैला सोडत काढली जाणार आहे. २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सूचना आणि हरकती दाखल करता येतील. ५ ऑगस्टला अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.