मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू त्यानंतर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या टार्गेटबाबत फोडलेला लेटरबॉम्ब या सर्व घटनांमुळे मुंबई पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली होती. ही मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी नवनियुक्त मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिस दलात जोरदार झाडाझडती सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयुक्तांनी प्रत्येक प्रादेशिक विभागाला भेटी देऊन तेथील पोलिस अधिकाऱ्याच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बैठक घेणार
मुंबई पोलिस दलाचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी उत्तर प्रादेशिक विभागाला भेट दिली. या भेटीदरम्यान परिमंडळ-१२ च्या पोलिस उपायुक्त कार्यालयासह येथील बीट चौकीचे उद्घाटन पोलिस आयुक्त नगराळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीमध्ये पोलिसांना काही सूचना देण्यात येणार असून गुन्ह्यावर नियंत्रण, परिसरातील बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः एनआयएने पाठवले क्राईम ब्रॅंचच्या एका अधिका-याला समन्स… कोण आहे हा अधिकारी?)
जागा अडवून बसलेल्यांच्या झाल्या बदल्या
मुंबई पोलिस दलात नवीन पोलिस आयुक्त आल्यास एका आठवड्यात मुंबईतील सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बैठक(क्राइम मीटिंग) घेण्यात येते. मात्र नगराळे यांनी आयुक्तपदाचा पदभार सांभाळून १३ दिवस झाले मात्र अद्याप क्राइम मीटिंग झालेली नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी म्हटले आहे. तसेच गुन्हे शाखेत अनेक वर्षांपासून जागा अडवून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community