राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजुर केलेला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प ३२ महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. हा प्रकल्प राज्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.
( हेही वाचा : महापालिकेने १०० कोटींचे कंत्राट दिले, तेव्हा ‘ती’ कंपनी अस्तित्त्वातच नव्हती… )
रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभे राहणार आहे. या माध्यमातून ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. या क्लस्टरसाठी ४९२.८५ कोटी रुपये खर्च होणार असून, हा प्रकल्प ३२ महिन्यात पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून, इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.
पुण्यात आणखी एक प्रकल्प
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरशिवाय पुण्यात आणखी एक प्रकल्प मंजुर झाला आहे. सीडॅक असे या प्रकल्पाचे नाव असून, या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे २ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. युती सरकारने हे प्रकल्प राज्यात येण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. यास्तव समितीची १९ जुलै २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
…असा असेल प्रकल्प
- पुणे जिल्ह्यातील राजंणगाव एमआयडीसीत हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारले जाणार आहे. हे क्लस्टर तयार करण्याची जबाबदारी प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून एमआयडीसीची असणार आहे. २९७.११ एकर जागेवर हे क्लस्टर साकारणार असून, त्यासाठी पायाभूत सुविधांवर ४९२.८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
- यातील २०७.९८ कोटी रुपये केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार आहे. आगामी ३२ महिन्यांत हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारणार आहे. यात इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक आणि घटक इत्यादी उद्योग मोठ्या प्रमाणात येणार आहेत.