नवे शिवसेना भवन, मग जुन्या शिवसेना भवनाचे काय?

125

बातमी या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. सध्या आपण कशालाही बातमी म्हणजे, शौचास बसलेले असताना बाहेरुन दार ठोठावलं यावरुन संजय राऊतांचं भांडण झालं, ही बातमी आहे असं प्रसारमाध्यमांना वाटतं. पण खरी बातमी वेगळीच असते. शिंदेंच्या शिवसेनेची पहिली शाखा मुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे सुरु करण्यात आली आहे. बातमी पुढे आहे. या शाखेमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो लावलेला नाही. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मात्र लावलेला आहे.

( हेही वाचा : विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणता ‘राम’?)

याबाबत खासदार राहुल शेवाळे यांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिलेली आहे. “उद्धव ठाकरे यांनीच सांगितलं होतं की, देशाचे विकासाचे काम करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्या . जे हिंदुत्वासाठी नेतृत्व करतात त्यांचे फोटो लावले आहेत. शासकीय कार्यालयात मोदींचा फोटो असतो. शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे. त्यामुळे हा फोटो लावला आहे. आम्ही शरद पवार किंवा सोनिया यांचा फोटो लावला नाही.”

“शिवसेनेच्या शाखा या मागील २ वर्षात महाविकास आघाडीची कार्यालयं झाली होती. १९६६ सालाची शिवसेना निर्माण करणार” असंही शेवाळे म्हणाले. त्यांचं विधान अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण पवार किंवा सोनिया गांधींचा फोटो लावला नाही, याचा अर्थ उद्धव ठाकरे हे पवार आणि सोनिया गांधींना शरण गेले आहेत, असंच राहुल शेवाळे यांना म्हणायचं आहे.

ठाकरे शिवसैनिकांच्या मनातून उतरले आहेत हा सुप्त संदेश शेवाळे देतात. म्हणूनच की काय, एकनाथ शिंदे दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारणार असल्याची बातमी आहे. नवं शिवसेना भवन याचा अर्थ जुन्या शिवसेना भवनात आता ती क्षमता उरलेली नाही. शिवसेनेच्या शाखा मागीत २ वर्षात महाविकास आघाडीची कार्यलये झाली होती. तीच गत शिवसेना भवनाची झाली आहे असं तर त्यांना सांगायचे नाही ना?

बाळासाहेब गेल्यानंतर मातोश्रीचं पावित्र्य हरपलं अशी काही शिवसैनिकांची धारणा आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करुन शिवसेना भवनाची प्रतिष्ठा देखील गमावली गेली आहे. त्यामुळे आता जुन्या शिवसेना भवनात जनतेची कामे होणार नाहीत आणि आपण जनतेच्या सेवेस तत्पर आहोत असा संदेश देण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचं महत्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे दादरमध्ये नवे सेना भवन उभारत असतील. आता कुणाला प्रश्न पडू शकतो की जुन्या शिवसेना भवनाचे काय करावे. झुणका भाकर केंद्राचे औढे काय झाले आहे हे सर्वांनाच माहित आहे. असो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.