भारतासाठी पुढची 25 वर्षे खूप महत्त्वाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

128

भारतासाठी आगामी 25 वर्षे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन समारंभात ध्वजारोहणानंतर संबोधित करताना ते बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली असून, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, आपण स्वत:चीच प्रशंसा करत बसलो तर आपली स्वप्ने दूर निघून जातील. त्यामुळे 75 वर्षांचा कालखंड कितीही कठीण, चांगला असला तरी पुढील 25 वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे 130 कोटी देशवासीयांच्या स्वप्नांकडे मी पाहत आहे. आगामी 25 वर्षांसाठी पंचप्राणावर आपली शक्ती केंद्रित करावी लागेल. जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करावे लागेल. ज्यावेळी स्वप्ने आणि संकल्प मोठे असतात त्यावेळी शक्तीदेखील तितकीच मोठी असते. स्वातंत्र्याचा संकल्प मोठा होता. हा संकल्प मोठा असला तरी तो पूर्ण केला गेला. येत्या 25 वर्षात आपल्याला भारताला विकसित करायचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे होतील तेव्हा आजचे तरुण 50 ते 55 वर्षांचे होतील. तुमचे हे वय देशाला विकसित करण्याचे वय आहे. तरुणांनी तिरंग्याची शपथ घेऊन पुढे जावे. देशाच्या विकासासाठी काम करावे. भारत जेव्हा मोठे स्वप्न पाहतो, ते करुनदेखील दाखवतो.

जगाच्या सर्टिफिकेटवर किती दिवस जगायचं

देशातील लाखो कुटुंबाच्या घरी पाणी, वीज पोहोचण्याचे काम केले जात आहे. आपण सर्वांनी एकदा संकल्प केला तर ते पूर्ण होतात. येणारी 25 वर्षे मोठ्या संकल्पाची आहेत. हाच आपला प्राण आणि प्रण हवा. आपण जगाच्या सर्टिफिकेटवर किती दिवस जगायचे. आपण आपले मानांकन तयार करू शकत नाही. आपल्याला दुसऱ्यांसारखे दिसायची गरज नाही. आपण सामर्थ्याने उभे राहू. आपल्याला गुलामीपासून मुक्ती हवी आहे. आपल्यामध्ये गुलामीचे एक तत्वदेखील नसावे. आपल्याला आपल्या परंपरेचा अभिमान असायला हवा. जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडले जाऊ तेव्हाच गगनभरारी घेऊ शकू. आपल्या वारशामुळे आज जग प्रभावित होत आहे. आपण निसर्गावर प्रेम करणारे आहोत. ग्लोबल वार्मिंगचे समाधान आपल्याकडे आहे. सामाजिक, वैयक्तिक तणावाचा विषय निघतो तेव्हा आपल्या कौटुंबिक व्यवस्थेकडे आस्थेने पाहिले जाते. आपण नदीला आई मानतो. आपण नरला नारायण म्हणतो. झाडामध्ये देव पाहतो. आपण वसुदैव कुटुंबकमचा मंत्र जगाला दिला आहे. देशाच्या 130 कोटी जनतेने अनेक वर्षांनी अनुभवले की, स्थिर सरकारचे काय महत्त्व आहे, राजकीय स्थिरतेचे महत्त्व काय असते, योजनेमध्ये काय सामर्थ्य असते, जगभरात कसा विश्वास निर्माण होतो हे जगाला समजले आहे. निर्णयात गतीशिलता, सर्वव्यापकता, सर्वसमावेशकता असेल तर विकासात प्रत्येकजण सहभाग घेतो. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जगाने पाहिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव बनवण्याचे काम सुरु आहे. पाणी संवर्धनासाठी मोठे अभियान राबवले जात आहे. गरिबांचे कल्याण, स्वच्छतेचे अभियान असो देश पूर्ण शक्तीने पुढे जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला पंतप्रधान 

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आपण मोठे संकल्प घेऊनच पुढे जाऊयात. आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पाहावे लागेल. आपल्या मनात गुलामीचा अंश असेल तर त्याला बाहेर काढायचे आहे. आपल्याला थोडी जरी गुलामी दिसत असेल तर आपल्याला या गुलामीपासून मुक्ती मिळवावी लागेल. हा दुसरा प्राण आहे. आपल्याला आपल्या वारशाविषयी अभिमान हवा. या वारशाप्रती आपल्याला गर्व असायला हवा. हा दुसरा प्राण आहे. चौथा प्राण एकता हा आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतासाठी एकता महत्त्वाची आहे. नागरिकांचे कर्तव्य हा पाचवा प्राण आहे. नागरिकांच्या कर्तव्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश होतो. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. विश्व भारताकडे गर्वाने, अपेक्षाने पाहतोय. प्रत्येक समस्येचं समाधान शोधण्यासाठी जग आपल्याकडे पाहत आहे. जगाच्या विचारांमधील हा बदल आपल्या 75 वर्षांच्या यात्रेचा परिणाम आहे. आज जग अपेक्षा घेऊन जगत आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आपल्याकडे चांगली संधी आहे. भारतीयजनतेतील सामूहिकतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली. देशामध्ये किती सामर्थ्य आहे हे तिरंग्याच्या माध्यमातून जगाला समजले आहे. थाळी, टाळ्या वाजवून देशातील नागरिकांनी कोरोना वॉरियर्सना पाठिंबा दिला. यातून चेतना निर्माण झाली. जेव्हा जग कोरोना काळात लस घ्यावी की नाही या मानसिकतेत होते तेव्हा भारताने जगाला 200 कोटी लसीचे डोस दिले. भारत देश हा लोकशाहीची मातृभूमी आहे. आमच्याकडे अनमोल सामर्थ्य असल्याचे भारताने सिद्ध केले आहे. देशाने मला 2014 साली संधी दिली. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेला मी पहिला पंतप्रधान आहे. मी माझा पूर्ण कालखंड लोकांच्या कल्याणासाठी घालवला. दलित, दिव्यांग, महिला, शेतकरी, आदिवासी यांना समर्थ बनवण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केलं. भारताच्या लोकांमध्ये आकांक्षा आहेत. आज भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, वर्गात आकांक्षा वृद्धींगत झाल्या आहेत.

( हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ‘या’ क्रांतीकारकांचे स्मरण करण्याची ही वेळ; पंतप्रधानांनी जागवल्या स्वांतत्र्यलढ्यातील आठवणी )

यांच्या स्मरणाचा हा दिवस

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोक लढतील. भारत अंधकारयुगात जाईल, अशा अनेक कुशंका व्यक्त केल्या गेल्या. मात्र या देशाच्या मातीत सामर्थ्य आहे. आपण अन्नाचे संकट झेलले. कधी युद्धाची शिकार झालो. दहशतवादाचे संकट आले. अनेक लोकांचा मृत्यू झाला. नैसर्गिक संकटे आली आहेत. मात्र, भारत देश पुढे चालला आहे. भारताची विविधता हीच भारताची अनमोल शक्ती आहे. स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलताना, आपण आदिवासी बांधवांचे स्मरण केले पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनून अनेक आदिवासी बांधवांनी मातृभूमिसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यढ्याचे अनेक अंग आहेत. तिरंगा, मातृभूमीसाठी अनेकांनी मोठ्या यातना सहन केल्या. आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. या निमित्ताने देशाचे जवान, पोलीस, लोकप्रतिनिधी, सैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासक, प्रशासक यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.