बुडत्याचा पाय आणखी खोलात… वाझेचे वाजले की बारा!

दिवसेंदिवस सचिन वाझेच्या अडचणी वाढत असून, त्याचे चांगलेच बारा वाजले आहेत.

100

मनसुख हिरेन आणि अंबानी स्फोटके प्रकरणाचा एनआयएने एकदम तळाशी जाऊन तपास सुरू केला आहे. एनआयए हा तळ गाठत असताना, सचिन वाझेची अवस्था मात्र बुडत्याचा पाय आणखी खोलात शिरावा तशी झाली आहे. या बुडत्याला काठीचा काय काडीचाही आधार कोणी देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सचिन वाझेच्या अडचणी वाढत असून, त्याचे चांगलेच बारा वाजले आहेत.

प्रकरण एनआयएकडे सुपूर्द

आता एनआयएने सचिन वाझे विरुद्ध युएपीए कायदा लावल्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन मृत्यूचा तपास एनआयएकडे सोपवावा असे मुंबई एटीएसला आदेश देऊन सुद्धा एटीएसने या प्रकरणाचा तपास चालूच ठेवला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आपल्याकडे वर्ग करण्यात यावा म्हणून एनआयएने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार, बुधवारी सायंकाळी मनसुख हिरेन हत्येच्या तपासाची कागदपत्रे आणि अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचा ताबा एटीएसने एनआयएकडे सुपूर्द केला आहे.

(हेही वाचाः हिरेन मृत्यू प्रकरणात आता नवीन माहिती… ‘तो’ अधिकारी माफीचा साक्षीदार होणार!)

वाझेच्या अडचणी वाढल्या

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी एनआयएकडून सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती. एनआयएने वाझे विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलमांत वाढ केली आहे. युएपीए कायद्याअतंर्गत कलम-१६ आणि कलम-१८ या गुन्हयात वाढवण्यात आले आहे. युएपीए कायदा बेकायदेशीर कृत्य अथवा दशतवादी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध दाखल केला जातो. या कायद्यात कलम-१६ म्हणजे बेकायदेशीर कृत्य रचणे आणि कलम-१८ म्हणजे एकत्रित कट रचणे असा आहे. सचिन वाझे याने मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करुन दशतवादी कृत्य केल्याचे उघडकीस आल्यानंतर, वाझे याच्या कलमात वाढ करण्यात आली आहे. युएपीए कायद्यामुळे सचिन वाझे याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

(हेही वाचाः ठाकरे सरकारची अधिका-यांनी उडवली झोप! कॅबिनेटमध्येही गाजला मुद्दा)

वाझेची कोठडी वाढणार?

बुधवारी सायंकाळी एटीएसने ठाणे न्यायालयाच्या आदेशानुसार, मनसुख हिरेन हत्या प्रकरण एनआयएकडे सोपवले असून, या गुन्हयातील कागदपत्रे आणि जप्त केलीली मालमत्ता आणि अटक केलेल्या आरोपींचा ताबा सायंकाळी एनआयएच्या स्वाधीन करण्यात आला आहे. मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी या दोन्ही प्रकरणांचा तपास आता एनआयए ही एकच यंत्रणा करणार आहे. एनआयएच्या कोठडीत असलेला सचिन वाझे याला गुरुवारी सकाळी एनआयएतर्फे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनआयएकडून त्याची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.