मनसुख हिरेन हत्येच्या तपासाला आता गती आली आहे. या प्रकारणात एनआयएच्या हाती काही ठोस पुरावे लागले असल्याची माहिती मिळत आहे. या पुराव्यांवरुन एनआयए आता एका बड्या माजी पोलिस अधिकारी आणि गुन्हे शाखेतील एक अधिकारी या दोघांना लवकरच अटक करण्याची शक्यता आहे. या माजी अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर मात्र राजकीय वातावरण देखील तापू शकते असे म्हटले जात आहे.
हिरेन मृत्यूच्या आधी अधिकारी आणि वाझेंची भेट
मनसुख हिरेन याच्या हत्येच्या आदल्या रात्री एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि विनायक शिंदे हे दोघे अंधेरीतील चकाला येथे एक माजी पोलिस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याला भेटले होते. त्यावेळी त्यांच्यात गुप्त बैठक पार पडली होती अशी माहिती एनआयएच्या हाती लागली आहे. एनआयएने या अधिकाऱ्यांचे सीडीआर(कॉल डेटा रेकॉर्ड) तपासले आहेत, तसेच त्यांचे लोकेशन(ठाव ठिकाणा) एनआयएच्या हाती लागले आहे.
(हेही वाचाः एनआयएमधून आलेल्या अधिकाऱ्याकडे सीआययूची धुरा! )
ते सीसीटीव्ही फुटेज मिळाले… तर होणार अटक
बुधवारी एनआयएच्या एका पथकाने चकाला येथे जाऊन, तेथील सीसीटीव्हीचा शोध घेतला. मात्र ज्याठिकाणी हे चौघे भेटले, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही अद्याप मिळू शकलेले नाही. गुरुवारी पुन्हा एनआयए पथक चकाला येथे जाणार असून, तेथील सीसीटीव्हीचा शोध घेणार असल्याचे समजते. या ठिकाणचे ३ मार्चचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागल्यास सचिन वाझे या अधिकऱ्यांना भेटला हे निश्चित होईल व त्या पुराव्यावरुन प्रथम या बड्या माजी अधिकाऱ्यांना एनआयए चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
बाबुलनाथ येथील हॉटेलची एनआयएकडून तपासणी
सचिन वाझेला मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात अटक केल्यानंतर एनआयएचे पथक वाझेला घेऊन बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी घेऊन गेले होते. त्या ठिकाणी वाझेला १५ ते २० पाऊले चालण्यास का सांगण्यात आले होते, याचा उलगडा गुरुवारी झाला आहे. गुरुवारी सकाळी एनआयएचे पथक बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी असलेल्या सोनी इमारतीत असणाऱ्या कल्चर हाऊस या हॉटेलमध्ये दाखल झाले होते. हॉटेलचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना एनआयएने बाहेर थांबण्यास सांगून संपूर्ण हॉटेलची झाडाझडती सुरू केली आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापक यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू असून काही कागदपत्रे, तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे.
Join Our WhatsApp Community