‘पेंग्विन’च्या बालहट्टामुळे राणी बागेचे शुल्क वाढले! नितेश राणेंचा हल्लाबोल

जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतः करु शकतात तर पेंग्विनची का नाही? हा पंधरा कोटीचा पेंग्विन देखभालीचा ठेका कोणासाठी?, असा सवाल आमदार नितेश राणेंनी केला आहे.

85

राणीच्या बागेचा महसूल वाढल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मात्र हा महसूल पेंग्विनच्या बालहट्टामुळे राणीच्य बागेचे प्रवेश शुक्ल वाढवल्यामुळे वाढलेला आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महसूल वाढलेला नाही, अशा शब्दांत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी लेखी पत्राद्वारे महापौर पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

‘पेंग्विन’च्या दबावामुळे खोटी आकडेवारी!

‘पेंग्विन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला, महापालिकेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ लाख ५७ हजार ०५९ होती पण मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीय. त्यामुळे तीन वर्षांत सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे. मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेले. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही, असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचा : ओबीसी आरक्षणाचा आध्यादेशही अडचणीत! कारण काय?)

वाघाची देखभाल महापालिका करू शकते तर पेंग्विनची का नाही?

एवढेच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितले, पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतः करु शकतात तर पेंग्विनची का नाही? हा पंधरा कोटीचा पेंग्विन देखभालीचा ठेका कोणासाठी? राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले. इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठीट खुले केले गेले नाहीत मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.