ट्वीट करण्यासाठी सेना भवनातून कलाकारांना जातात फोन… नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा!

छोट्या कलाकारांना ट्वीट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते. त्यासाठी थेट सेना भवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात.

आपल्या आक्रमक स्टाईलमध्ये नेहमीच शिवसेनेवर प्रहार करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी, शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेना भवन मधून कलाकारांना ट्वीट करण्यासाठी फोन केले जातात, असा आरोप त्यांनी केला आहे. टिव्ही ९ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी जोरदार हल्ला चढवला. तसेच आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडे पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिल झाले, हे सर्व मला माहीत आहे. छोट्या कलाकारांना ट्वीट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते. त्यासाठी थेट सेना भवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

ती एजन्सी अनेक कलाकारांच्या संपर्कात

सरकारी तिजोरीत खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाऊंटस् सांभाळण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते. तसेच ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पाटनी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्वीटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींना पैसे देऊन ट्वीट करवून घेतले जात आहे, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला आहे.

(हेही वाचाः अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? आता दिल्लीचे पथक येणार मुंबईत)

याआधी भर सभागृहात सेनेचे वाभाडे

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी भर सभागृहात शिवसेनेचे वाभाडे काढले होते. नितेश राणे यांनी सभागृहात अभिनेता दिनो मोरिया आणि युवा सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर टीका केली होती. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान नितेश राणे यांनी सभागृहात राणे स्टाईलने प्रहार केला. अभिनेता असलेला दिनो मोरिया सांगतो, मी या सरकारमधील कोणतेही काम करुन देतो. हा कुणाचा मित्र आहे, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला होता. तसेच नाईट लाईफ गॅंग तयार होत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता. नितेश राणे यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांना राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेल्या वाय-प्लस सुरक्षेवर देखील टीका केली होती. कोणी तरी सरदेसाई सारखा येतो आणि वाय-प्लस दर्जा मिळवतो, असे म्हणत हे सरदेसाई कोण आहेत? सरकार यांना का पाठिंबा देते? हे का अधिकाऱ्यांना फोन करतात? तसेच हे का मंत्रालयात फिरतात, असे सवाल देखील नितेश राणे यांनी सभागृहात उपस्थित केले होते.

(हेही वाचाः धक्कादायक! देशात १ लाख कोटींची कर्ज थकबाकी! आरबीआयची कबुली! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here