राणे आणि ठाकरे हा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. नारायण आणि त्यांची दोन्ही मुले सातत्याने शिवसेनेवर टीका करताना आपण नेहमीच पाहतो. मात्र आता भर सभागृहात भाजप आमदार नितेश राणे यांनी नाव घेता, शिवसेनेचे वाभाडे काढले. कोण हा दिनो मोरिया, हा सरकारचा जावई लागतो का? असा सवाल करत नितेश राणे यांनी सभागृहात अभिनेता दिनो मोरिया आणि युवा सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान नितेश राणे यांनी राणे स्टाईलने प्रहार केला. अभिनेता असलेला दिनो मोरिया सांगतो मी या सरकारमधील कोणतेही काम करुन देतो. हा कुणाचा मित्र आहे, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. तसेच नाईटलाईफ गॅंग तयार होत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे.
(हेही वाचाः ऑक्सफर्ड विद्यापीठात हिंदुद्वेष, विद्यार्थी नेत्या रश्मी सामंतची मानसिक छळवणूक!)
वरूण सरदेसाई यांच्यावर टीका
नितेश राणे यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांना राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवर देखील टीका केली. कोणी तरी सरदेसाई सारखा येतो आणि वाय प्लस दर्जा मिळवतो, असे म्हणत हे सरदेसाई कोण आहेत? सरकार यांना का पाठिंबा देते? हे का अधिकाऱ्यांना फोन करतात? तसेच हे का मंत्रालयात फिरतात, असा सवाल देखील नितेश राणे यांनी सभागृहात उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख आहे की हे राज्य आर्थिक संकटात आहे. सरकारमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे आर्थिक संकट आले आहे का? याचा विचार व्हायला हवा. तसेच या सरकारमधील भ्रष्टाचार फक्त अधिकाऱ्यांपुरता आहे का? असा सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचाः अंबानींच्या इमारतीबाहेरील ‘त्या’ संशयास्पद वाहनाच्या मालकाचा मृत्यू! )
वांद्रे-कुर्ला संकुल येथे इन्कम टॅक्स इमारत आहे. त्याच्यासमोर वैभव चेंबर इमारत आहे. त्यामध्ये अधिकारी का जातात? तिथे कोण जातो याची चौकशी व्हायला हवी, असे देखील नितेश राणे सभागृहात म्हणाले. जंबो कोविड सेंटर ज्यांनी बांधले ते नेमके कुणाच्या आशीर्वादाने, एवढेच नाही तर रिझवी कॉलेजच्या बाजूला एक बंगला आहे तिथे अधिकारी आणि मंत्री का जातात, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. या सरकारला ५ आणि ८ हे दोन आकडे माहीत आहेत. आता पाच आकडा याचा अर्थ पाच महिने, की पाच टक्के याचे उत्तर द्यायला हवे, असे देखील नितेश राणे म्हणाले.
ते तर परिवार मंत्री
नितेश राणे यांनी यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील जोरदार टीका केली. अध्यक्ष महोदय राज्याला जो परिवहन मंत्री आहे, तो परिवार मंत्री आहे. तो फक्त कलानगरमध्ये घुटमळत असतो, असे सांगत आम्हाला एक परिवहन मंत्री द्या असे नितेश राणे म्हणाले. तसेच पूजा चव्हाण आणि दिशा सालीयन या तरुणींच्या आत्महत्येचा मुद्दा देखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला. आज कुठलाही मंत्री फसला की सर्व यंत्रणा कामाला लागते. दिशा सालीयनला कुणी पार्टीला बोलावले, असे म्हणत गुन्हे कसे लपवायचे याचे सध्या ट्रेंनिग सुरू असल्याचे म्हणत आता वर्षाताईंना सांगितले पाहिजे यांच्यासाठी ट्रेंनिग शाळा घ्या, असे नितेश राणे म्हणाले.
(हेही वाचाः पंचतारांकित हॉटेलच्या किचनमध्ये झुरळे!)