राणे आणि ठाकरे कुटुंबीयांमधला वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. अनेकदा या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर टीकांचे वाक्बाण भिरकावले आहेत. आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौ-यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आपण गेलो की तिथे भीतीचं वातावरण निर्माण होतं, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान!)
आम्ही आल्यानंतर त्यांना भीती वाटायची
आम्ही पूर्वी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भेट द्यायला गेलो किंवा भेटीची तारीख जाहीर झाली तर लगेच तिथे भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं. तिथे शिवसैनिकांना गोळा केलं जायचं, शिवसेना आमदारांना आणि नगरसेवकांना संदेश पाठवून त्यांना गोळा व्हायला सांगितले जायचे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात व्हायचा. पण तशी भीती मला नाही. ते माझ्या मतदारसंघात केव्हाही येऊ शकतात, नागरिकांशी आणि मतदारांशी चर्चा करू शकतात. मला माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, असे नितेश राणे यावेळी म्हणाले.
मी घाबरत नाही
जसे नितेश राणे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात गेल्यावर ते घाबरतात, तसे आदित्य ठाकरे देवगडात आल्यानंतर नितेश राणे घाबरत नाहीत, हाच संदेश मी त्यांना दिलेला आहे. ते तरुण आहेत, माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा पुन्हा याठिकाणी यावं आणि इथल्या व्यावसायिकांशी चर्चा करावी, असाही सल्ला त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
(हेही वाचाः नवनीत राणांची एकच तक्रार अन् राज्यातील चार अधिकाऱ्यांना थेट नोटीस!)
ती विकास कामं आमचीच
आदित्य ठाकरेंनी कोकण दौरा करुन तिथल्या विकास कामांचा दौरा केला. खरं तर आमच्याच माध्यमातून मान्यता मिळालेली ती विकास कामं आहेत. आणि त्याचीच पाहणी ते करत आहेत. तरीही ते जिल्ह्यात येऊन विकास कामांना चालना देण्याचं काम करतात ही चांगलीच बाब आहे. असे म्हणत कोकणातील विकासकामांचे श्रेय हे भाजपचेच असल्याचा अप्रत्यक्ष दावाही नितेश राणे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community