सरकारकडून फ्रंटलाईन वर्करची फरफट, श्रेयासाठी मात्र धडपड

100

कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणले. दवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीत फ्रंटलाईन वर्कर, कोविड वॉरिअर्सनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांची आघाडी सरकारने फरफट केली आहे, त्यांच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी मात्र धडपड सुरू केली आहे, अशी टीका भाजपा नेते नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण बाकी 

आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलने करावी लागली, सरकार साथ विम्याच कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकले नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या. ज्या फ्रंटलाईन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाच भांडवल करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पूर्ण करता आलेला नाही. २६ जानेवारीपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे डोस झालेले नाहीत! ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे.

(हेही वाचा धक्कादायक! २ कोरोनाग्रस्तांचे मृतदेह १६ महिन्यांनी सापडले! शवागृहात काय घडले?)

महापालिकेचा हलगर्जीपणा 

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जनांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्याचं कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच दर्शवते.

सेनेचे स्वार्थी धोरण  

आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापर कोरोनावर फोडायचं आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. कालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळात करोनाच्या नवीन व्हेरीअंट बाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे की, ही वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल. म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छीतो. जेणेकरून महानगर पालिकेचे फ्रंटलाइन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्यांच्या सोबत संधीसाधूपणाचं राजकारण तर करत नाही ना?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.