शिवसेनेचे हिंदुत्व भेंडी बाजारातील! नितेश राणेंचा घणाघात

129
शिवसेना नक्की कोणत्या विचारांची आहे, हे ठरवावे. एकदा शिवसेना म्हणते ते सेक्युलर आहेत, एकदा ते स्वतःला हिंदुत्ववादी समजतात. दोन्हींच्या मध्ये राहणाऱ्यांना काय म्हणतात हे सगळ्यांना माहीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे भेंडीबाजारातील आहे, असा घणाघात भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी केला.
राणीच्या बागेत हजरत पीर बाबा असा फलक लावण्यात आला आहे, त्यावर राणीच्या बागेचे नाव शिवसेनेने बदलले असा आरोप नितेश राणे यांनी केला. याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेची बदनामी करत आहेत म्हणून शिवसेनेने वरळीत, भोईवाडा, काळाचौकी येथे तक्रार केली. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, सामानाच्या कार्यालयातील हिंदुत्व आम्हाला शिकवू नये, असाही टोला हाणला.

रात्रीच्या बैठका करतात म्हणून आदित्य ठाकरेंना धमक्या 

मंत्री आदित्य ठाकरे यांना धमक्या कोणत्या आवाजात येतात, असा खोचक सवाल करत आदित्य ठाकरे यांनी रात्रीच्या बैठका बंद केल्यावर त्यांना येणाऱ्या धमक्या बंद होतील, असेही राणे म्हणाले.

…तर आधी आदित्य यांच्यावर कारवाई करा 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याविरोधात तक्रार करून पोलिसांनी समन्स पाठवला आहे. यात शिवसेना आपल्याला बळीचा बकरा बनवत आहे. कारण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे शिवसेनेतीलच अंतर्गत दुफळी कारणीभूत आहे. जिल्ह्यात सेनेची दोन सत्ताकेंद्रे बनली आहेत. माझ्यावर जर आरोप करून चौकशी करणार असाल तर आधी आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.

आदित्य विधानभवनात येताच काढला आवाज म्याव… म्याव

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याव… म्यावच्या घोषणा दिल्या. नितेश राणे या घोषणा देत असताना भाजपचे नेते मात्र हसत होते. आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते. काय म्हणाले दादा, ठाकरे सरकार शोधून आणा… अशा घोषणा विरोधक देत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव… म्याव… म्याव… म्याव… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.